जळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट खरेदीत फसवणूक केल्या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तर एका महिलेस अटक करण्यात आली. अरुणा दिलीप चौधरी (52, रा.एलआयसी कॉलनी, जळगाव) असे अटकेतील महिलेचे नाव आहे.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा
सुरेश मांगीलाल बाफना (रा.सुयोग कॉलनी) यांनी एमआयडीसी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बाफना यांच्या मालकीचा जळगाव मनपा हद्दीत मेहरूणमधील शेत सर्व्हे क्रमांक 163/1 ब मधील बखळ प्लॉट क्रमांक 17 असून त्याची किंमत 35 लाख रुपये आहे. हा प्लॉट इम्रान मुख्तार तांबोळी (रा.प्लॉट क्रमांक 45, इंद्रप्रस्थनगर एमआयडीसी) याने खरेदी केला. त्याबाबत दुय्यम निबंधक जळगाव- 1 यांच्याकडे तसा दस्त क्रमांक 756/2021 नुसार खरेदीखत नोंदवून प्लॉट खरेदी केला आहे. दरम्यान, खरेदीखत करताना अरुणा दिलीप चौधरी (52, रा.एलआयसी कॉलनी) व फारुख शेख रहेमदुल्ला खाटीक (47, रा.मास्टर कॉलनी) यांनी हजर राहून खरेदी लिहून घेणार व लिहून देणार यांना ओळखतात, अशी खोटी माहिती सांगून सर्वांनी संगनमताने बाफना यांच्या नावाचे आधारकार्ड व पॅनकार्ड बनावट तयार केले. ते खरे असल्याचे भासवून त्या कागदपत्रांनुसार बाफना यांच्या प्लॉटची खरेदी करून फसवणूक करण्यात आली. हा व्यवहार 2 मार्च 2021 रोजी झाला.
सातबारा पाहताच बसला धक्का
स्वत: सुरेश बाफना यांना या प्रकाराची कोणतीही कल्पना नव्हती. त्यांनी 24 जानेवारी रोजी मेहरुण तलाठी कार्यालयातून सातबारा उतारा घेतल्यानंतर या उतार्यावरील नाव कमी होवून इम्रान मुख्तार तांबोळी, रजीयाबी मुश्ताक खाटीक, शेख अयुब शेख युसूफ तांबोळी, शेख जुबेर शेख सलीम खाटीक यांचे नाव लागलेले दिसले. यामुळे त्यांना धक्का बसला. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली. तेथे 2 मार्च 2021 रोजी खरेदी झाल्याचे दस्तावरुन निदर्शनास आले. मालकी हक्काबाबत वर्तमानपत्रात जाहीर नोटीसही देण्यात आली होती. बाफना यांनी खरेदीखत प्राप्त केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या अनुषंगाने या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील महिला अरुणा चौधरी यांना अटक करण्यात आली.