बारामती : दिवाळीनिमित्त बारामती शहर व ग्रामीण भागामध्ये शोभेची दारू व फटाके विक्रीचे परवाने देण्याबाबत व फटाके विक्री दुकाने उभारण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारी बाबतची बैठक मंगळवारी तहसिल कार्यालयात तहसिलदार हनुमंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली.
पाटील म्हणाले, फटाके विक्रीसाठी रीतसर परवानगी घेणे बंधनकारक आहे. दुकाने उभारताना शासनाच्या अग्निशमन संचालनालयाने दिलेले नियम व अटी पाळणे गरजेचे आहे. फटाके विक्री परवाना फटाका विक्री संघाच्या नावे न घेता ज्यांचे दुकान आहे त्यांच्या नावे घेण्यात यावा. तसेच शहरातील फटाके दुकानांसाठी जे नियम व अटी लागू आहेत तेच ग्रामीण भागासाठी लागू राहतील. नगरपरिषद विभागाने ज्या ठिकाणी दुकाने उभारण्यात येणार आहेत त्या ठिकाणची पाहणी करून बाजूला असलेले रेल्वे स्टेशन, शाळा, रहदारीचा रस्ता यापासून नियमानुसार अंतर ठेवूनच फटाका दुकानांची आखणी करावी. ग्राहकांसाठी पार्किंगची सोयही करण्यात यावी. दुकानांची आखणी करण्याचे काम अग्निशामक विभागाला सोबत घेऊनच करावी. फटाके विक्रीच्या परवानगीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करावा म्हणजे परवान्याबाबतची कार्यवाही वेळेत पूर्ण होईल. उशीरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असेही, पाटील यावेळी म्हणाले.
पोलीस विभागाने परिसरात नियमितपणे गस्त ठेवावी. महावितरण विभागाने पथदिव्यांची सोय करावी, शासनाने दिलेल्या नियमांचे व अटींचे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.