मुंबई – ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके,ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे वर्ष ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यात येणार आहे. त्यानिमित्त गठित केलेल्या समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, सांस्कृतिक कार्य संचालक संजीव पलांडे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि लेखक-साहित्यिक, नाटककार पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे वैभव आहे, हे वैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचून या पिढीला प्रेरणा मिळाली पाहिजे. हे तीनही मान्यवर आपापल्या क्षेत्रात मोठे होते, व्यक्ती म्हणून देखील मोठे होते मात्र जनतेपर्यंत त्यांच्या कलेचा अविष्कार पोहोचत असताना त्यांचे व्यक्तिमत्व देखील जनतेपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. आज या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने गठित समितीने जे विविध कार्यक्रम सूचविले आहेत, त्या सर्व उपक्रमांचे संकलन करुन त्याची सविस्तर मांडणी व्हावी आणि वर्षभर या कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. ज्यांच्याकडे या तीनही मान्यवरांच्या संदर्भातील दुर्मिळ व्हिडिओ, छायाचित्रे, मुलाखती असतील त्यांनी शासनाच्या या समितीकडे हे साहित्य पाठविण्याचे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी सविस्तर वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या नियोजन आणि अंमलबजावणीत समितीने योगदान देण्याचे आवाहन यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केले. या जन्मशताब्दीवर्ष निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बैठकीला ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त,संगीतकार ह्रदयनाथ मंगेशकर, मधु मंगेश कर्णिक, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, सीमा देव, संगीतकार श्रीधर फडके,दिनेश ठाकूर, किशोर कदम, रेश्मा कारखानीस यांचेसह अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांचेसह समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबद्दलच्या संकल्पना या समिती सदस्यांनी मांडल्या.