मुंबई: विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून माजी मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी वारंवार बोलून देखील दाखविली आहे. दरम्यान त्यांनी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. विधान परिषदेसाठी माझी, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आम्हाला उमेदवारी देण्यात आली नाही. आमची फसवणूक करण्यात आली असा थेट आरोप खडसे यांनी केला आहे.
ज्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांनी मार्च महिन्यातच कागदपत्रे काढून ठेवली होती, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळणार हे मार् मध्येच निश्चित होते असेही खडसे यांनी सांगितले. एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना ते बोलत होते. पक्षाशी निष्ठावंत असणाऱ्यांना संधी देण्यात आली नसून भाजपमध्ये आता लोकशाही राहिलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे. पार्लमेंट्री बोर्डने नाव निश्चित केल्यानंतर आज रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने भाजपात लोकशाही आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.