फडणवीस सरकारची दडपशाही ; आंदोलनापूर्वीच सोपान पाटलांना घेतले ताब्यात

1

शेतकर्‍यांच्या न्यायासाठी निवेदन देण्यापूर्वीच अन्यायकारक कारवाई -राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्षांचा आरोप

रावेर- मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी सकाळी 11 वाजता लालबाग जवळील सागर टॉवरमैदानावर होणार्‍या सभेत शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी निवेदन देण्यासाठी जाणार्‍या राष्ट्रवादी किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांना पोलिसांनी कलम 68 अन्वये ताब्यात घेतल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाले आहेत. फडणवीस सरकारची ही दडपशाही असून पोलिसांच्या बळाचा चुकीच्या पद्धत्तीने हे सरकार वापर करीत असल्याचा आरेाप सोपान पाटील यांनी केला.

आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांची कारवाई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेत काळे झेंडे दाखविणार असल्याचा व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नी निवेदन देणार असल्याचे राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील यांनी जाहीर केले होते. त्यामुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने आंदोलन करण्यापूर्वीच सोपान पाटील यांना शनिवारी सकाळी कलम 68 नुसार ताब्यात घेत रावेर पोलिस ठाण्यात आणल्याने रावेर तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ही तर फडणवीस सरकारची दडपशाही -सोपान पाटील
शेजारच्या राज्यातील केळी नुकसानग्रस्तांना वीज बिल माफ करण्यात आले, हेक्टरी लाखाची मदत मिळाली मात्र महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना तुटपुंजी म्हणजे हेक्टरी 13 हजार 500 रुपये भरपाई देण्यात आल्याने हा सापत्नभाव मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आपण निवेदन देणार होतो मात्र फडणवीस सरकारने पोलिस बळाचा वापर करून आपल्याला पोलिस ठाण्यात नजरकैदेत ठेवल्याची बाब संतापजनक आहे. हे सरकार पोलिस बळाचा चुकीच्या पद्धत्तीने वापर करीत आहे. या सरकारला मतदार त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही सोपान पाटील म्हणाले.