Two wiremen died due to lightning in Fatehpur जामनेर : शेतात खांबावरील तार निसटल्याचा निरोप आल्याने तातडीने कर्तव्यावर हजर झालेल्या वायरमन यांचा विद्युत शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे सोमवारी सकाळी 10 वाजता घडली. गणेश प्रकाश नेमाडे (45, रा.कन्हाळा ता. भुसावळ) आणि सुनील भरतसिंग चव्हाण (40, रा.टाकळी पिंप्री ता. जामनेर) अशी मयतांची नावे आहेत. गणेश हे अनुकंपाखाली नोकरीला होते तर सुनील हे झिरो वायरमन असल्याचे सांग्यात आले.
विद्युत तारेला स्पर्श करताच मृत्यू
फत्तेपूर येथील पेट्रोल पंपासमोरील कापसाच्या शेतात खांबावरील तार खाली पडल्याची माहिती कळाल्यानंतर गणेश आणि सुनील यांनी धाव घेतली मात्र या तारेला हात लावताच गणेश यांना शॉक लागला आणि ते जागीच ठार झाले तर दवाखान्यात नेत असतानाच सुनील यांचा रस्त्यात मृत्यू झाला. गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. गणेश व सुनील चव्हाण यांचे मृतदेह जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्या केलेल्या आक्रोशामुळे उपस्थितांचेही डोळे पाणावले. सुनील चव्हाण याच्या पश्चात वृध्द आई वडील, पत्नी व मुलगा आहे.
गिरीश महाजनांकडून आश्वासन
दरम्यान, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी जामनेर उपजिल्हा रुग्णालयात जाऊन मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि शासनाकडून मृतांच्या वारसांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.