फरहानने पटकावला ‘क्षेत्र श्री’चा बहुमान!

0

नवी मुंबई । वैशिष्ट्यपूर्ण नागरी सेवा सुविधा प्रकल्पांसाठी ज्याप्रमाणे देशभरात नावाजली जाते त्याचप्रमाणे येथील कलावंत, खेळाडूंसाठी विविध उपक्रम राबवून त्यांच्यातील अंगभूत गुणांना वाव देत सांस्कृतिक शहर म्हणूनही ओळखली जावी, हा नवी मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न असून त्यादृष्टीने विविध कला, क्रीडा उपक्रम राबवले जात असल्याची माहिती देत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी शरीरसौष्ठवाची आवड जपणारे तरुण त्यामधून आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश जनमानसात प्रसारित करतात, अशा शब्दांत शरीरसौष्ठवपटूंचे कौतुक केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झालेल्या ‘नवी मुंबई महापौर राज्यस्तरीय’ आणि ‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ खुल्या शरीरसौष्ठव स्पर्धेनिमित्ताने ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. 180 हून अधिक शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग लाभलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत ‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ किताब पुण्याच्या महेंद्र चव्हाण या शरीरसौष्ठवपटूने 1 लक्ष 25 हजार पारितोषिक रकमेसह पटकावला.

शरीरसौष्ठवपटूंनाही प्रोत्साहित करत कौतुक
‘नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र श्री’ पुरस्काराचा 50 हजार रकमेच्या पुरस्काराचा मानकरी फरहान सय्यद ठरला. याप्रसंगी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, सभागृहनेते रवींद्र इथापे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती विशाल डोळस व उपसभापती रमेश डोळे, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे मुख्य संचालक मदन कडू, सहसचिव सुनील शेडगे व हेमंत खेबडे आणि खजीनदार शरद मारणे तसेच नवी मुंबई बॉडी बिल्डिंग असो.चे अध्यक्ष जी.एस.पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार संजीव नाईक यांनी कोणताही उपक्रम सातत्याने सुरू ठेवणे ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत नवी मुंबई महानगरपालिकेने 1996 पासून सातत्याने महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करून शहरातील व्यायामप्रेमी तरुणांचा उत्साह वाढवला आहे तसेच राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनाही प्रोत्साहित केले आहे याबद्दल कौतुक केले.

‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ शरीरसौष्ठव किताबाचा मानकरी महेंद्र चव्हाण याने आपल्या मनोगतात मागील 11 वर्षांपासून या स्पर्धेत सहभागी होत असल्याचे सांगत या स्पर्धेची आम्हा शरीरसौष्ठवपटूंच्या मनात एक वेगळी प्रतिमा असून या स्पर्धेची आम्ही सर्वजण वाट पाहत असतो असे मत मांडले. या स्पर्धेचे टायटल मारायचे हे माझे 11 वर्षांपासून स्वप्न होते, अनेकदा ते स्वप्न अपूर्ण राहिले. मात्र, जिद्द सोडली नाही अखेरीस आज ते स्वप्न पूर्ण झाल्याचा वेगळा आनंद होत असल्याचे त्याने सांगितले.‘नवी मुंबई महापौर श्री राज्यस्तरीय’ स्पर्धेमध्ये मुंबई उपनगरचा संदेश सकपाळ, ठाण्याचा नितिन म्हात्रे, मुंबई उपनगरचा प्रतिक पांचाळ, ठाण्याचा श्रीनिवास खाखी, मुंबई उपनगरचा विघ्नेश पंडीत, मुंबई उपनगरचा सुशील मुरकर, मुंबई उपनगरचा सकिंदर सिंग या सातही गटातील विजेत्यांशी लढत देत 85 किलो वरील वजनी गटाचा विजेता पुण्याचा महेंद्र चव्हाण हा ‘नवी मुंबई महापौर श्री किताब’ विजेता ठरला.

प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिके प्रदान
मुंबई उपनगरचा सकिंदर सिंग याने उपविजेतेपदाचा बहुमान संपादन केला. पुण्याच्या आकाश आवटे याने ‘बेस्ट पोझर’ तसेच मुंबईच्या सुशील मुरकर याने ‘प्रगतिकारक शरीरसौष्ठवपटू’ ही पारितोषिके पटकावली.‘नवी मुंबई महानगरपालिका श्रेत्र श्री’ स्पर्धेमध्ये फरहान सय्यद हा क्षेत्र श्री किताब विजेता तसेच शैलेश मोकल हा उपविजेता ठरला. राज्यस्तरीय स्पर्धेत 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो, 75 किलो, 80 किलो, 85 किलो व 85 किलोवरील असे आठ वजनी गट होते. अशाचप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शरीरसौष्ठवपटूंसाठी 50 किलो, 55 किलो, 60 किलो, 65 किलो, 70 किलो तसेच 70 किलोवरील व 75 किलो वजनी गटातील प्रत्येकी सहा विजेत्यांना प्रशस्तिपत्रासह रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.