धुळे। फरार असलेल्या संशयित आरोपीच्या अटकेनंतर त्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात पोलिसांच्या वाहनाच्या स्टेअरींगचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वाहन उलटून झालेल्या अपघातात धुळे व औरंगाबाद येथील पाच पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. औरंगाबाद येथील एका गुन्ह्यात फरार असलेला संशयित सादीक शेख नुरअहमद शेख (34) रा़मौलवीगंज धुळे हा 3 जुलै रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव क्रॉसींगजवळ औरंगाबाद पोलिसांच्या पथकाला आढळून आला़
वाहनावरील नियंत्रण सुटले
त्यांनी तातडीने चाळीसगाव रोड पोलिसांना माहिती दिली़ पोलिसांनी त्याला रात्रीच ताब्यात घेतले आणि त्याला एमएच 18 एएफ 0187 या वाहनात बसवून पोलीस ठाण्यात आणत असतांना त्याने पळून जाण्यासाठी चालकाच्या हातातून स्टेअरींग फिरविल़े त्याच्या या कृतीने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनात बसलेले हेडकॉन्स्टेबल एऩ व्ही़ शेख, हेडकॉन्स्टेबल एस़ ए़ पाटील, कॉन्स्टेबल एच़ आऱ पवार, औरंगाबाद ग्रामीणच्या चिखलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एऩ बी़ कटकुरी, हेड कॉन्स्टेबल एल .बी .मोरे हे पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत़