फराळाइतकीच दिवाळी अंकांची मेजवानी आनंददायी – कीर्ती शिलेदार

0

अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे दिवाळी अंक दालनाचे उद्घाटन

पुणे : दिवाळीचा सण हा इतर अनेक गोष्टींमुळे हवाहवासा वाटतो, तसाच तो दिवाळी अंकांमुळे देखील चैतन्य निर्माण करणारा असतो. लाडू, चकल्या, चिवडा या खुसखुशीत फराळाइतकीच दिवाळी अंकांची मेजवानी आनंददायी असते, असे मत नाट्य संमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केले. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे दिवाळी अंक दालनाचे उद्घाटन कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, प्रा.मिलिंद जोशी, रसिका राठीवडेकर, रमेश राठीवडेकर उपस्थित होते. यावेळी अक्षरधारा दिवाळी अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अंकांचा दर्जा लक्षात यायचा

शिलेदार म्हणाल्या, आमचे नाना खूप वाचायचे आणि दिवाळी अंकांच्या वाचनाची आवड त्यांच्यामुळे घरात सगळ्यांनाच निर्माण झाली. आमच्या लहानपणी दिवाळीच्या खरेदीमध्ये दिवाळी अंकांची खरेदी हा एक महत्त्वाचा भाग असायचा आणि दिवाळी अंक विकत घेण्यासाठी पैसे बाजूला ठेवले जायचे. मुखपृष्ठ, आतील चित्रे यावरूनच दिवाळी अंकांचा दर्जा लक्षात यायचा. पुन्हा एकदा बालपणातील दिवाळीतील ते दिवस अनुभवता आले याचा विशेष आनंद होतो आहे.

‘शब्दोत्सव’ जवळचा वाटतो

प्रा. जोशी म्हणाले, मराठी माणसाला दिवाळी अंकांचे आकर्षण खूप आधीपासून आहे. दीपोत्सवाप्रमाणेच हा ‘शब्दोत्सव’ आपल्याला अधिक जवळचा वाटतो. या शब्दोत्सवाला 109 वर्षांची परंपरा आहे. विविध साहित्य प्रकारांना चालना मिळाली असून विविध प्रवाहांच्या साहित्याचे अंकही निर्माण झाले, ही आनंदाची बाब आहे.