फसव्या जाहिराती करणार्‍या विकासकांच्या मुसक्या आवळा

0

मुंबई । प्रकल्प राबवताना जागेच्या विक्रीसाठी जाहिरात करताना प्रकल्पाच्या मूळ ठिकाणाचे नाव व पिनकोड बदलून चुकीची जाहिरात प्रसिद्ध करून लोकांची आर्थिक लूट करणार्‍या विकासकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी (विनियमन व विकास) अधिनियमांतर्गत तयार करण्यात येणार्‍या नियमामध्ये योग्य तरतूद करण्यात यावी, अशी सूचना गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे गौतम चॅटर्जी यांना केली आहे.

खाजगी विकासक मुंबई शहरात प्रकल्प राबवताना विकसित जागेच्या विक्रीसाठी जाहिरात करतांना प्रकल्पाच्या मूळ ठिकाणाचे नाव पिनकोड बदलून चुकीची व दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध करून लोकांची आर्थिक लूट करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. यात कलानगर-वांद्रे या विभागाचे बीकेसीएल, जोगेश्‍वरी विभागाचे अंधेरी, लोअर परेल विभागाचे अपर वरळी इत्यादी तसेच असेच प्रकार राज्यातील अनेक मोठ्या शहरांतील नामांकित भागात होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

अशा प्रकारे विकासक विकसित होणार्‍या जागेच्या नावात परस्पर बदल करतात व जाहिरातींद्वारे ग्राहकांना भुरळ पाडतात. प्रत्येक विभागाचा पिनकोड ठरलेला असतो. त्याचप्रमाणे जाहिरात न करता वरील प्रमाणे चुकीची व खोटी जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल केली जाते. अशाप्रकारे लोकांची फसवणूक करून कायद्याचे उल्लंघन करीत आहेत. याला आळा बसविण्यासाठी तसेच अशा फसव्या जाहिराती करणार्‍या विकासकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थावर संपदा (विनियमन व विकास) अधिनियमांतर्गत तयार करण्यात येणार्‍या नियमामध्ये योग्य तरतूद करावी.