फांद्या तोडण्यासाठी नगरसेवकांची शिफारस महत्वाची

0

वृक्ष प्राधिकरण समितीच्या सभेत निर्णय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये धोकादायक झालेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावयाची असल्यास अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक नगरसेवकाची शिफारस असणे आवश्यक असणार आहे. फांद्या छाटणीच्या कार्यवाहीनंतर वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत या कामाला कार्योत्तर मान्यता दिली जाणार आहे. वृक्ष प्राधिकरणाच्या सोमवारी झालेल्या सभेत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. शहराच्या विविध भागांमध्ये अस्ताव्यस्त वाढलेल्या झाडांच्या फांद्या तत्काळ तोडणे आवश्यक असल्याची बाब या सभेत काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिली. तत्काळ फांद्या छाटण्याची गरज भासल्यास तो प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मंजुर होण्यास बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे तत्काळ फांद्या छाटण्यासाठी स्थानिक नगरसेवकाचे शिफारस पत्र असणे आवश्यक आहे. या फांद्या छाटणीनंतर या कामाला कार्योत्तर मान्यता देण्याचा प्रस्ताव या सभेत मंजुर करण्यात आला आहे.

नारळाच्या झाडांना जीवदान

शहराच्या विविध भागांत प्रामुख्याने खासगी जागेत नारळाची झाडे आहेत. मात्र, या झाडांच्या फांद्या व अन्य बाबींमुळे निर्माण होणारा कचरा व झाडांच्या वाढीमुळे अनेक भागातील ही झाडांबाबत अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाला प्राप्त होत आहेत. त्यामुळे ही झाडे सरसकट मुळापासून न तोडता त्याचे महापालिकेची उद्याने व अन्य जागांवर पुनर्रोपण करण्याची चाचपणी करण्याच्या सूचना उद्यान विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यानंतर या बाबीची चाचपणी केली जाणार आहे. ही चाचपणी यशस्वी झाल्यास शहरातील अनेक नारळाच्या झाडांना जीवदान मिळणार आहे.