मुंबई । आयपीएलचा रोमांच आता शिगेला पोहोचला आहे. अंतिम टप्प्यात आलेल्या या मोसमात आता तुल्यबळ असे चार संघ पोहोचले आहेत. मंगळवारी रायझिंग पुणे सुपरजायंटस आणि मुंबई इंडियन्स या दोन महाराष्ट्रीयन संघामध्ये सामना रंगणार असून हा सामना रोमांचक होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सुरुवातीपासूनच फार्मात असलेल्या मुंबईच्या समोर पुण्याच्या संघाचे कडवे आव्हान आहे. घरच्या मैदानावर होत असलेल्या या सामन्यात मुंबईला मानसिक आधार असेल तर लगातार विजयामुळे पुण्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. भेदक गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर रायझिंग पुणे सुपरजायंटस संघाने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला चिरडून टाकत प्लेऑफच्या फेरीत दुसरे स्थान पटकावले तर मुंबई आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने नंबर एकवर विराजमान आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळतील
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्कने व्यक्त केला. भारतीय क्रिकेट मंडळावर आकस असणार्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉस हेझलवूड अशा पाच प्रमुख खेळाडूंबरोबर तीन वर्षांचा करार करणार आहे. त्यामुळे ते पुढील आयपीएलपासून भारतात खेळू शकणार नाहीत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येऊन खेळण्यास उत्सुक असतात. प्रत्येकाला या स्पर्धेत खेळण्यास आवडते. त्यामुळे अशा प्रकारे रोखणे योग्य नाही, असे मत क्लार्कने व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात येऊन खेळतील मी तरी नक्की येणार आहे, असेही क्लार्क म्हणाला. क्रिकेट हा विश्वातील मोठा खेळ आहे आणि त्याची प्रगती अशीच होत राहील. डेव्हिड वॉर्नरही भारतात पुन्हा येईल आणि स्टीव स्मिथही आयपीएलमध्ये पुन्हा येऊन खेळेल, असाही विश्वास क्लार्कने व्यक्त केला.
विरोधी गोलंदाजाकडून विराटचे कौतुक
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी चॅम्पियन करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी करेल, असा विश्वास न्यूझीलंडचा गोलंदाज टीम साऊथीने व्यक्त केला आहे. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी सज्ज झालाय. आयपीएलमधील अपयश विसरुन गतवर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली केलेली कामगिरी करण्याचे विराटसमोर आव्हान असेल. तो गतवर्षीची पुनरावृत्ती करेल, असा विश्वास व्यक्त करत साऊथीने विराटचे कौतुक केले आहे. कोणत्याच गटातील संघाला मी कमकुवत मानत नाही. यावेळी त्याने आगामी स्पर्धेसाठी उत्सुक असल्याचेही सांगितले.
मुंबईकडे दोन विजयाचा अनुभव
आयपीएलच्या यंदाचे पर्व आता रंगतदार टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. मंगळवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपरजाएंट्स हा पहिला क्लॉलिफायर सामना खेळविण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सने यंदा भन्नाट कामगिरी करून गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले. तर पुण्यानेही अखेरच्या सामन्यांमध्ये नेत्रदिपक कामगिरीची नोंद करून दुसरे स्थान गाठले. महाराष्ट्रातले हे दोन संघ आयपीएलच्या धर्तीवर भीडणार आहेत. मुंबईकडे दोन वेळा जेतेपद पटकावल्याचा अनुभव असला तरी पुण्याचाही संघ नव्या दमासह यंदा आयपीएलच्या जिंकण्याची संधी दवडणार नाही. मुंबईने 14 सामन्यांपैकी 10 सामने जिंकून 20 गुणांसह पहिले स्थान कमावले. तर रायझिंग पुणे सुपरजाएंट्सने 18 गुणांसह दुसरे स्थान मिळावले. रात्री 8 वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.