सोनई तिहेरी हत्याकांडाचा निकाल 20 जानेवारीला
नाशिक : अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या सोनई तिहेरी हत्याकांडाची नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयातील सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली. शिक्षेबाबत न्यायालय शनिवारी (दि.20) निर्णय देणार आहे. गुरूवारी दोन्ही पक्षाच्या वकिलांचा शिक्षेवरील युक्तिवाद पूर्ण झाला. आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायलयाकडे केली.
कमीत कमी शिक्षा द्यावी : बचाव पक्ष
1 जानेवारी 2013 रोजी घडलेल्या आणि राज्याला हादरवून सोडणार्या सोनई तिहेरी हत्याकांडाप्रकरणी सोमवारी नाशिकमधील जिल्हा सत्र न्यायालयाने सहा जणांना दोषी ठरवले होते. तर एकाची पुराव्याअभावी मुक्तता केली होती. दोषींच्या शिक्षेबाबत गुरुवारी न्यायालयात सुनावणी झाली. अर्धा तास चाललेल्या युक्तिवादात बचाव पक्षातर्फे तीनपैकी दोन वकीलच न्यायालयात सुनावणीसाठी उपस्थित होते. सर्व दोषींच्यावतीने दोन्ही वकिलांनी बाजू मांडली. दोषींमध्ये तीन जण तरुण आहेत. तर दोन जण वयोवृद्ध आहेत. याचा विचार करुन त्यांना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली.
कट रचून अत्यंत थंड डोक्याने हत्या केली
बचावपक्षाच्या युक्तिवादानंतर सरकारी वकील उज्वल निकम यांनी बाजू मांडली. सर्व दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. इंदिरा गांधी खटल्याचा दाखलाही त्यांनी युक्तिवादादरम्यान दिला. निकम यांनी युक्तिवादात 13 मुद्दे मांडले. आरोपींनी केलेले कृत्य हे राक्षसांप्रमाणे क्रूर आहे. कट रचून अत्यंत थंड डोक्याने आरोपींनी पीडितांची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे केले. या कटात सहभागी असलेल्या सर्वांना समान म्हणजेच फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असे अॅड. निकम यांनी सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने 20 जानेवारी रोजी शिक्षेसंदर्भात निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केले.