फुकट्या प्रवाशांवरील कारवाईमुळे बेस्टच्या उत्पन्नात वाढ

0

मुंबई । बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात असल्याने या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. बेस्टच्या परिवहन विभागाला प्रवाशांकडून उत्पन्न मिळते. मात्र फुकट्या आणि तिकिटापेक्षा जास्त अंतर प्रवास करणार्‍या प्रवाशांमुळे बेस्टला आर्थिक नुकसान होते. अशा फुकट्या प्रवाशांविरोधात वेळोवेळी कारवाई करण्यात येत असल्याने अशा प्रवाशांची संख्या गेल्यावर्षी पेक्षा कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आले आहे. बेस्ट उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. बेस्टवर विविध बँका आणि मुंबई महापालिकेचे कर्ज आहे. हे कर्ज फेडताना बेस्टची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच उत्पन्न कमी येत असल्याने कामगारांचे पगारही वेळेवर मिळत नाहीत. अशा परिस्थितीत बेस्टला वाचवण्यासाठी उत्पन्न वाढवण्यासाठी बेस्टकडून विविध प्रयत्न सुरू आहेत.

फुकट्या प्रवाशांमुळे बेस्टला कमी महसूल मिळत असल्याने अशा प्रवाशांविरोधात सतत कारवाई सुरु असते. या कारवाईबाबतच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते ऑगस्ट 2017 या आठ महिन्यांत 48 हजार 538 प्रवाशांना पकडण्यात आले त्यांच्याकडून 42 लाख 69 हजार 443 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर मागील वर्षी फेब्रुवारी ते सप्टेंबर 2016 या कालावधीत 55 हजार 666 फुकट्या प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून 48 लाख 71 हजार 612 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. मागील वर्षांपेक्षा यावर्षी सात हजार फुकटे प्रवासी कमी करण्यात बेस्ट उपक्रमाला यश आले आहे.