जळगाव रेल्वे स्थानकावर विशेष मोहिमेत एक लाख 42 हजारांच्या दंडाची वसुली ; 40 निरीक्षकांसह नऊ सुरक्षा कर्मचार्यांच्या उपस्थितीत धडक मोहिम
भुसावळ- रेल्वे प्रवासात नियम धाब्यावर बसवून फूकट प्रवास करणार्यांसह सर्वसाधारण डब्यात आरक्षित तिकीटावर प्रवास करणार्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने धडक मोहिम सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वी भुसावळसह जळगावात कारवाई केल्यानंतर शुक्रवारी जळगाव रेल्वेस्थानकावर 40 तिकीट निरीक्षकांसह नऊ रेल्वे सुरक्षा बल कर्मचार्यांच्या उपस्थितीत राबवलेल्या विशेष मोहिमेत 356 केसेसच्या माध्यमातून तब्बल एक लाख 42 हजार 605 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या या मोहिमेचा फुकट्या प्रवाशांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून आले.
एकाचवेळी धडक तपासणी मोहिम
जळगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाड्यांसह स्थानकावरील फुकट्या प्रवाशा विरुद्ध व अतिरिक्त सामान घेऊन प्रवाश्यांविरुद्ध शुक्रवारी सकाळी आठ ते दुपारी चार वाजेच्या सुमारास धडक मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 356 केसेस करण्यात आल्या तर एक लाख 42 हजार 605 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
यांचा मोहिमेत सहभाग
ही मोहिम सहायक वाणिज्य प्रबधंक (गुड्स) अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. पथकात 40 तिकीट निरीक्षक व नऊ रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत बिना तिकीट प्रवास करणार्या 166 प्रवाशांकडून 65 हजार 205 रुपयांचा दंड तर अनियमित यात्रा करणार्या 183 प्रवाशांकडून 78 हजार 900 तसेच सात प्रवाशांनी सामानाचे बुकींग न करताच वाहतुक केल्याने त्यांच्याकडून 750 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला. या कारवाईत एन.पी.पवार, वी.के.भंगाळे, वाय.डी.पाठक, विवेन रॉड्रिक्स, अमित शर्मा, एस.पी.मालपुरे, पी.एम.पाटील, आर.पी.सरोदे, एल.आर.स्वामी, ए.के.गुप्ता, ए.एम.खान, अनिल खर्चे, अजय बच्छाव, निलेश पवार, ए.एस.राजपूत, निलेश पवार, जी.एस.शुल्का, शेख अल्ताफ, पुष्पा पांडे, बी.एस.महाजन व सर्व तिकीट कर्मचारी उपस्थित होते.