छतरपूर : माझ्यासोबत लढण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही. म्हणूनच ते माझ्या आईला राजकारणात ओढत आहेत. फुटीचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसला माफ करू नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलं. रुपयाचे अवमूल्यन होत असून, त्याचे मूल्य पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या वयाच्या जवळपास पोहोचले आहे, असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते राज बब्बर यांनी केलं होत. त्यानंतर मोदींनीही मध्य प्रदेशातील प्रचार सभेत काँग्रेसवर पलटवार केला आहे.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी छतरपूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना जनतेनं ‘मामा’ संबोधलेलं काँग्रेसच्या नेत्यांना आवडत नाही. मग ते आपल्या एंडरसन आणि क्वात्रोची मामांबद्दल का बोलत नाहीत, असा टोलाही मोदींनी लगावला. या मामांपैकी एकाशी संगनमत करून बोफोर्स घोटाळा केला तर भोपाळ गॅस दुर्घटनेतील आरोपी एंडरसनला विशेष विमानानं देशाबाहेर पाठवलं, असा आरोपही मोदीनी केला. मतदान करण्यासाठी जाताना काँग्रेसला १५ वर्षांपूर्वी राज्यातून का हद्दपार केलं होतं, हे आठवा. फुटीच्या राजकारणामुळं जनता त्यांच्यावर नाराज होती. काँग्रेसचं भविष्य आजही असंच आहे. देशातील सव्वाशे कोटी जनताच आमची हायकमांड आहे. आमचं सरकार हे ‘मॅडम’च्या रिमोट कंट्रोलवर चालणारं नाही, अशी टीकाही मोदींनी केली .