फुरसुंगी ग्रामस्थांनी काढली कचराडेपोची अंत्ययात्रा

0

फुरसुंगी : उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचराडेपो कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी बुधवारी कचराडेपोची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून आपले आंदोलन पुढे सुरूच ठेवले आहे. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध कायम ठेवल्याने पुणे शहरातील कचराप्रश्‍नामुळे आरोग्यचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे.

घनकचरा व्यवस्थापनचा विरोधातील फलक
मंतरवाडी चौकापासून सकाळी अकराच्या सुमारास कचराडेपोच्या प्रतिकात्मक अंत्ययात्रेस सुरुवात झाली. तिरडीवर महापालिका घनकचरा व्यवस्थापन, पालिकेचा कचराडेपो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचा प्रतिकात्मक पुतळा ठेवण्यात आला होता. खासदार सुप्रिया सुळे याठिकाणी आल्यानंतर या आंदोलनास सुरुवात झाली. कचराडेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी या अंत्ययात्रेपुढे मडके धरले होते, पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनचा विरोधातील फलक हातात धरून काही ग्रामस्थ राम-नामाचा गजर करीत टाळ वाजवित होते.

प्रतिकात्मक पुतळ्यास अग्नी
अंत्ययात्रेमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, तात्या भाडळे, विजय भाडळे, अर्चना कामठे, अजिंक्य घुले, रोहिणी राऊत, अनिल टिळेकर, डॉ. बाळासाहेब हरपळे, दिलीप मेहता, धनंजय कामठे, सुहास खुटवड, दिलीप भाडळे, सरपंच गीता बनकर, अश्‍विनी आबनावे यांच्यासह दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘कचराडेपो कायमस्वरूपी बंद झालाच पाहिजे,’ ‘पालिका प्रशासन व राज्य शासनाचा निषेध असो’ अशा घोषणा देत मंतरवाडी चौकातून अंत्ययात्रा कचराडेपोच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आल्यानंतर याठिकाणी अंत्यसंस्काराचा विधी करून प्रतिकात्मक पुतळ्यास अग्नी देण्यात आला. पालिकेचा निषेध म्हणून संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी याठिकाणी स्वत:चे मुंडन करून घेतले.

परदेश दौरे म्हणजे बेफिकीरी
यावेळी खासदार सुळे म्हणाल्या, कचराडेपोला आग लागल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री याठिकाणी एकदाही फिरकले नाहीत, आयुक्त एकदाच भेट देऊन गेले, महापौर तर सध्या परदेश दौर्‍यावर गेल्या आहेत. शहरात कचर्‍याचा एवढा गंभीर प्रश्‍न असताना अशाप्रकारे पदाधिकारी व अधिकारी शहराला वार्‍यावर सोडून परदेश दौरे कसे करू शकतात. रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले असताना यांचे परदेश दौरे होत आहेत म्हणजेच त्यांना सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांशी काहीच देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता पंतप्रधानांनीच पुणे शहराच्या कचराप्रश्‍नात लक्ष घालण्याची गरज आहे.

ग्रामस्थांचा ठाम निर्धार
14 एप्रिलला कचराडेपोला आग लागल्यानंतर दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरागाड्या शहरात परत पाठवून आंदोलनास सुरुवात केली. भजन, जागरण गोंधळ, अर्धनग्न, घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून आपला निर्धार ठाम ठेवला आहे. मंगळवारीही तृतीयपंथीयांनी याठिकाणी येऊन पालिका प्रशासनांचा निषेध व्यक्त केला होता.

…पण शहरासाठी वेळ नाही
विनोदी कलाकार कपिल शर्माच्या ट्विटला मुख्यमंत्री लगेच उत्तर देतात मात्र पुणे शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न बिकट झाला असताना मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना वेळ नाही, हीच का तुमची पारदर्शकता, हीच का तुमची संवादयात्रा असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

सुतकामुळे दहा दिवस चर्चा बंद
23 वर्षांनंतर कचराडेपोचे अशाप्रकारे निधन झाल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी त्याच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली असून आंदोलनकर्ते दहा दिवस या प्रतिकात्मक मृत्यूचे सूतक पाळणार असून या दरम्यान कचराडेपोबाबत कोणाशीही कोणत्याही प्रकारची चर्चा ग्रामस्थ करणार नाहीत.
-तात्या भाडळे, कचराडेपो हटाव संघर्ष समिती