पुणे: फुले पगडीचा स्वीकार म्हणजे वैयक्तिक किंवा कोणत्या वर्गाच्या विरोधात मत मांडणे असे नव्हते. मी पुण्यात शिकलोय. पुण्याचा मला अभिमान आहे, पुण्यावर टीका केलेली नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. पुणे महापालिकेच्या पद्मावती येथील डॉ.कदम डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी फुले पगडीणे त्यांचा सन्मान करण्यात आला.
पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात फुले पगडीनेच स्वागत करण्याच्या दिल्या होत्या सूचना. आपल्या कार्यक्रमातून पुणेरी पगडी हद्दपार केल्यानंतर, पवारांवर टीका झाली होती. त्यानंतर पवारांनी पहिल्यांदाच याबाबत प्रतिक्रिया दिली. मी तीन जणांना माझा आदर्श मानतो. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर माझे आदर्श आहेत. छत्रपती एकच असतो म्हणून त्यांची पगडी, टोपी सर्वसामान्य नागरिकांनी घालायच्या नसतात. डॉ आंबेडकर हे कधी टोपी किंवा पगडी घालत नसत. म्हणून ज्योतिबा फुलेंचं आतापर्यंतचं कार्य पाहता मी त्यासाठी पुरस्कार केला आणि पगडीचा मी उल्लेख केला”, असं पवार म्हणाले.
महापौरांना टोला
पगडीवरुन पुण्यावर टीका असा काही भाग नाही. पुण्याचा मला अभिमान आहे मी पुण्यात शिकलोय, असं शरद पवारांनी नमूद केले. पुणे बदलत आहे असे मी आज पेपरमध्ये वाचले. ८० वर्षांनंतर पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देण्यात आला, असे म्हणत पवारांनी व्यासपीठावर असलेल्या महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे बघून हा टोला मारला. काल शाळा सुरु झाल्यावर सदाशिव पेठेतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ८० वर्षांनंतर मुलं आणि मुलींना एकत्र प्रवेश देण्यात आला. त्याचा संदर्भ पवारांच्या या वाक्याला होता.