फुल उत्पादकांची दिवाळी सुरू

0

सणासुदीच्या दिवसांत शेतकरी फुले तोडण्यात व्यस्त

पुरंदर : नायगाव परिसरातील फुलांना दिवाळी व दसर्‍यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. पुरंदर तालुक्यातील माळशिरस, पोंढे, राजेवाडी, आंबळे, टेकवडी आदी भागात मोठ्या प्रमाणात फुलांचे उत्पादन घेतले जाते. फुले लावण्यासाठी शेतकरी चैत्र महिन्यात तयारी सुरू करतात. या काळात फुलांना असलेली प्रचंड मागणी आणि फुले तोडण्यासाठी असलेल्या मजुरांच्या अभावामुळे फूल उत्पादक शेतकरी दिवाळीचा सण विसरून कुटुंबासह 10 ते 12 दिवस शेतातच फुले तोडणीस मग्न असतो. फुलांचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी दिवाळी साजरी करतात. दसरा आणि दिपावलीच्या सणांमध्ये फूल बाजारात अधिराज्य गाजवणार्‍या राजा शेवंतीची तोडणी उरकल्यानंतर फुलउत्पादक शेतकरी दिवाळी साजरी करतात. त्यांची ही दिवाळी आता सुरू झाली आहे.

शेतकरी वळले फुलशेतीकडे

पुरंदर तालुक्यात दरवर्षीच झेंडू, राजा शेवंती, कापरी, बिजली, पेपर व्हाईट इत्यादी फुलांचे पिक घेतले जाते. या फुलांचे उत्पादनही चांगले निघते. यामाध्यमातून शेतकर्‍यांना चांगले पैसे मिळतात. यामुळे अनेक शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत. पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात तर प्रमुख पीक म्हणून राजा शेवंतीचे पीक घेण्यात येते. जिल्ह्यामध्ये सर्वाधिक उत्पादन माळशिरस, टेकवडी व पोंढे या गावातून घेण्यात येते. पुरंदरच्या पश्‍चिम भागात बिजली, कापरी व झेंडुचे उत्पादन घेतले जाते.

दिवाळीत फुलांची मागणी वाढते

दरवर्षीच दसरा व दिपावलीच्या तोंडावर फुलांना मागणी वाढते. यामुळे दसरा व दिवाळीच्या सणांवेळी फूल उत्पादक शेतकरी आपल्या शेतामध्ये फूल तोडणीचे काम करतात. तोडलेली फुले बाजारपेठेत विक्रीसाठी नेतात हा दिनक्रम रोजच सुरू असतो. घरातील माणसे शेतात फुले तोडण्यात दंग असतात. आठ महिने पोटच्या पोराप्रमाणे संभाळलेली फुले दिवाळी सणात चांगला बाजारभाव मिळवून देतात. या फुलांच्या वरती शेतकर्‍यांचे वार्षिक गणीत अवलंबून असते. यामुळे दिवाळी उरकल्यानंतर फूल उत्पादक शेतकरी आपली दिवाळी साजरी करतात.