पुणे : शहरातील परप्रांतीय व स्थानिक फेरीवाल्यांकडून विविध गुन्हेगारी टोळ्यांचे म्होरके नियमित हप्तेवसुली करत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. तसेच, यातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांचे तर राजकीय साटेलाटेदेखील आहे. या हप्तेवसुलीतून त्या त्या बीटमधील पोलिसांनादेखील नियमित मलिदा जात असल्याने हे पोलिसदेखील फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करतात. फेरीवाल्यांना दरमहा हप्ता द्यावा लागतो. त्यातून राजकीय कार्यकर्ते, स्थानिक टोळ्यांचे म्होरके, पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी हे चांगलेच मालामाल होत असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हिंसक आंदोलनामुळे या सर्वांसह फेरीवाल्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून, नियमित हप्ते घेतात आता मनसेवाल्यांपासून संरक्षण द्या, असा तकादाच या फेरीवाल्यांनी संबंधितांकडे लावला आहे.
गंभीर गुन्हे दाखल झाल्याने मनसे संतप्त
मनसेने परप्रांतीय फेरीवाल्यांविरुद्ध मनसेस्टाईलमध्ये आंदोलन चालू केले आहे. एका पक्षाचे आंदोलन असल्याने याला राजकीय स्वरूप येणार हेसुद्धा अपेक्षित आहे. तशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मनसेच्या आंदोलनाला भाजपची फूस आहे असा आरोप काँग्रेस पक्षाने केला तर मनसेचे आंदोलन चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या पुण्यातील नेत्याने दिली आहे. शिवसेनेने मात्र आपली तठस्थ भूमिका ठेवली आहे. फेरीवाल्यांवर हात उचलणार्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे लावल्याने मनसेही नाराज आहे. मनसेला उत्तर देण्यासाठी हमारी अपनी पार्टीने फेरीवाला बचाव समिती स्थापन केली असून, पुढील काही दिवस राजकीय गदारोळ चालू राहण्याची शक्यता आहे. तसेच, दोन राजकीय पक्षात संघर्ष झडण्याचीही शक्यता आहे. या राजकीय पक्षाआडून विविध टोळ्यांचे म्होरकेदेखील मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अंगावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेरीवाल्यांविरुद्धच्या आंदोलनात मनसे एकटी पडली असून, पोलिसही त्यांनाच त्रास देत असल्याचे चित्र आहे.
रस्ते अन् गल्ल्या गुन्हेगारी टोळ्यांनी ताब्यात घेतल्या!
पुण्यात अधिकृत आणि अनधिकृत फेरीवाले कसे तयार होतात, अधिकृत म्हणविणारे फेरीवालेसुद्धा हातपाय कसे पसरत जातात ही बाब पुणेकरांना चांगली माहिती आहे. यात नागरिकांना त्रास झाला की महापालिका अधिकार्यांवर टीका होते. तात्पुरती कारवाई केली जाते, पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण होते. राजकीय पाठिंबा मिळत असल्याने कारवाई तोंडदेखली रहाते, हे उघड गुपित आहे. हप्तेबाजीत पोलिसही सामील असतात, काही वेळा तर हप्तेवसुलीत हद्दीचा वादही डोकावतो. परंतु, अलीकडे डेक्कन जिमखाना, तुळशीबाग, रेल्वे स्थानके, एसटी स्थानके अशा गर्दीच्या ठिकाणी जी अतिक्रमणे झाली आहेत त्यात गुन्हेगारी टोळ्यांचा हात आहे, अशी चर्चा ऐकू येते आणि ही बाब गंभीर आहे. पुण्यातील काही रस्ते आणि गल्ल्या गुन्हेगारी टोळीशी संबंधितांनी ताब्यात घेतल्या आहेत. तिथे त्यांची दहशत असते, पोलिस बघ्याची भूमिका घेत असल्याने सामान्य नागरिक तक्रार करीत नाहीत. अशा परिस्थितीत महापालिकेचा कर्मचारी काय कारवाई करणार? त्यांना संरक्षण कोण देणार? असा प्रश्न विचारला जातो. गुन्हेगारीच्या या पैलूकडे पोलिस आयुक्तांनी व महापालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज आहे.