फेरीवाल्यांना रात्री दादरमध्ये पायबंद!

0

मुंबई । फेरीवाल्यांविरोधात होत असलेल्या कारवाईतून पळ काढण्यासाठी हे फेरीवाले दादर रेल्वे स्टेशनलगत रात्री बसत असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी मुंबई पालिकेने रात्रीच्या वेळीही कारवाईचा निर्णय घेतला असून, यासाठी चार परवाना निरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. मुंबई शहरासह उपनगरात फेरीवाल्याविरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली असल्याने स्टेशन, पादचारी पूल फेरीवालामुक्त झाले आहेत.

पालिकेची फेरीवाल्यांवर कडक कारवाई
पश्‍चिम रेल्वेच्या दादर स्थानकाबाहेरच वडे-भजी यांची विक्री करण्यात येत आहे. त्याशिवाय पुलाव, अंडा ऑम्लेट या खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गाड्याही लागत आहेत. केशवसुत उड्डाणपुलाच्या खाली फळविक्रेता, भाजी विक्रेता बसू लागले आहेत. परंतु, याला रोखण्यात खासगी सुरक्षारक्षकही बिनकामाचे ठरले असून पोलीसही या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेने आता या परिसरावर रात्रीच्या वेळीही कडक कारवाई करण्यासाठी परवाना निरीक्षकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

रात्री नऊनंतर फेरीवाल्यांचा वावर
दादर रेल्वेस्थानकाबाहेर रात्री नऊ वाजता दुसर्‍या पाळीतील कर्मचार्‍यांची वेळ संपल्यानंतर फेरीवाले बसत आहेत. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानुसार अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड आणि उपायुक्त निधी चौधरी यांनी चार परवाना निरीक्षक देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार हे चार निरीक्षक आल्यानंतर रात्रीच्या वेळीही कडक कारवाई केली जाईल, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या जी-उत्तर विभागात 6 परवाना निरीक्षक आहेत. ही संख्या आता दहापर्यंत वाढवली जाणार आहे.