फेसबुकची जीओमध्ये ४३ हजार ५७४ कोटींची गुंतवणूक

0

मुंबई – जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्ममध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे. जिओमध्ये तब्बल ५.७ बिलियन डॉलर्स म्हणजे जवळपास ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा फेसबुकने बुधवारी केली.

सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली. हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे.