फैजपुरात काँग्रेसच्या मदतीने भाजपाचा उपनगराध्यक्ष

0

फैजपूर : येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपद तसेच दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी निवडणूक सर्वांगीणमते बिनविरोध प्रक्रिया पार पडली. नगरपालिका सभागृहात सकाळी 11 वाजता निवडणूक पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा महानंदा होले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार रशिद नासिर तडवी तसेच भाजपा आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष तथा दूध संघाचे संचालक हेमराज खुशाल चौधरी या दोन उमेदवारांमध्ये लढत होवून हेमराज चौधरी यांना भाजपासह काँग्रेसच्या नगरसेवकांनी हात वर करुन मतदान केले. त्यांना नगराध्यक्षांसह एकूण 14 मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या रशिद तडवी यांना चार मते मिळाली. स्विकृत नगरसेवकपदासाठी भाजपा आघाडीतर्फे देवेंद्र साळी तर फैजपूर विकास आघाडीने डॉ. इमरान अख्तर अब्दुल रऊफ यांची निवड केली. यावेळी राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी विरोधी गटाची 100 टक्के भूमिका घेतली. पिठासीन अधिकारी नगराध्यक्षा महानंदा होले यांनी निवड झालेल्या उमेदवारांची नावे सभागृहात जाहिर केली. या निवड प्रक्रियेत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले शिंदे यांसह विशाल काळे, बाणाईते, नितीन चौधरी, विलास सपकाळे यांनी सहकार्य केले. निवड प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पीएसआय निकुंभ यांनी बंदोबस्त राखला. दरम्यान, उपनगराध्यक्षपदासाठी भाजपा व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची युती झाल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. निवडप्रसंगी नगरसेवक मिलींद वाघुळदे, शकुंतला भारंबे, वत्सलाबाई कुंभार, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका अमिता चौधरी, काँग्रेसचे कलीमखाँ हैदरखाँ मन्यार, शाहिन परवीन, शकील खान, देवेंद्र बेंडाळे आदी उपस्थित होते.