फैजपूरच्या जे.टी.महाजन पॉलिटेक्नीकच्या प्राचार्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा

0

बनावट दाखल्याद्वारे पॉलिटेक्नीकला प्रवेश भोवला ; मुख्यमंत्र्यांनी घेतली तक्रारीची दखल

भुसावळ ः बनावट नॉन क्रिमीलेअर सादर करून फैजपूरच्या जे.टी.महाजन पॉलिटेक्नीकमध्ये प्रवेश मिळवत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी व शासनाला खोटी माहिती पुरवल्याप्रकरणी या अभियांत्रिकीच्या प्राचार्यांसह तिघांविरुद्ध फैजपूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील पॉलिटेक्नीकच्या कारभाराविरुद्ध प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अशा पद्धत्तीने आणखी काही बोगस प्रवेश आहेत का? असादेखील प्रश्न उपस्थित होत असून चौकशी होण्याची मागणी होत आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, शिक्षण संचालनालयाने केली चौकशी

भुसावळातील राजीव भानुदास चौधरी यांचे उत्पन्न जास्त असतानाही त्यांनी भालचंद्र अनिल इंगळे यांच्या महासुविधा केंद्रातून बनावट उत्पन्न दाखला काढल्याची व त्या माध्यमातून बनावट नॉन क्रिमीलेअर तयार केल्याची तक्रार भुसावळातील मनीष गणेश भट यांनी केली होती. तक्रारीत तथ्य आढळल्याने भुसावळ शहर पोलिसात राजीव चौधरींविरुद्ध तहसील प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. चौधरी यांनी याच दाखल्याचा आधार घेता मुलगा स्वराज्य राजीव चौधरी यास जे.टी.महाजन पॉलिक्लीनीकमध्ये प्राचार्य प्रदीप पाटील यांच्या सहकार्याने प्रवेश मिळवला होता. शहर पोलिसांनी बनावट दाखला असल्याचे सूचित करूनही प्राचार्यांनी स्वराज्यचा प्रवेश ओपन प्रवर्गातून झाल्याचे खोटे सांगितले. तक्रारदार मनीष यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दखल घेत शिक्षण संचालनालय, मुंबईला चौकशीचे आदेश दिले. त्यात खोटे प्रमाणपत्र सादर करून प्रवेश घेतल्याचे सिद्ध झाले.

प्राचार्यांसह पिता-पूत्रांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा

प्राचार्यांचा खोटारडेपणा उघड झाल्यानंतर फैजपूर पोलिसात मनीष भट (देना नगर, रींग रोड, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार फैजपूरच्या जे.टी.महाजन पॉलिटेक्नीकचे प्राचार्य प्रदीप भागवत पाटील, राजीव भानुदास चौधरी व त्यांचा मुलगा स्वराज्य राजीव चौधरी (दोन्ही रा.चंद्रमा अपार्टमेंट, नाहाटा कॉलेजमागे, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक रामलाल साठे करीत आहेत.