कामगारांसह ऊस उत्पादकांना दिलासा ; आमदार हरीभाऊ जावळेंच्या पाठपुराव्याला यश
फैजपूर- आर्थिक चक्रात अडकलेल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटला असलातरी राज्य शासनाकडून थकहमी मिळत नसल्याने ऊस उत्पादकांसह कामगारांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या होत्या मात्र जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथराव खडसे तसेच आमदार हरीभाऊ जावळे यांनी थकहमी मिळवून देण्यासंदर्भात पाठपुराव्याचे आश्वासन दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी शासनाने मसाकाला तत्वतः थकहमी देण्यास मान्यता दिली आहे. लवकरच कारखान्याला जिल्हा बँकेकडून सात कोटींचे कर्ज मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
थकहमीच्या पत्राने दिलासा
आमदार हरीभाऊ जावळे यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिराने राज्य शासनाने मसाकाला पूर्वहंगामी कर्जासाठी थकहमी देण्याबाबतचे पत्र काढले आहे. उपसचिव प्रमोद वळंज यांनी साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात मसाकाला सन 2017-18 ची देणी भागवण्यासाठी व सन 2018-19 चा हंगामपूर्व खर्च भागवण्यासाठी थकहमी देण्यास तत्वत: मान्यता पत्रात नमूद आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून सहकार्य -आमदार जावळे
फैजपूरातील कारखाना चालला पाहिजे, या भावनेतून तेथे काँग्रेसची सत्ता असली तरी राजकीय मतभेद बाजूला ठेवून आम्ही सहकार्य केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील थकहमीसाठी मदत केल्याचे आमदार हरीभाऊ जावळे यांनी सांगत शेकडो कामगार-मजूर आणि ऊस उत्पादक शेतकर्यांच्या घरातील चुली मसाकामुळे पेटतात, असे सांगितले.