फैजपूरात केळी खोडातून विषबाधा ; 15 गुरांचा मृत्यू

0

पशुधन मालकांचे लाखाचे नुकसान ; शासकीय यंत्रणा न पोहोचल्याने नागरीकांचा संताप

फैजपूर (प्रतिनिधी)- शहरातील खिरोदा रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ केळीचे खोड खाल्ल्याने विषबाधा होऊन 12 ते 15 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेने पशूधन मालकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

विष बाधेने मृत्यू झाल्याचा संशय
पशुधन मालकांनी गुरे चारण्यासाठी स्मशानभूमी जवळील मोकळ्या मैदानात 100 च्या जवळपास एकत्र आणलेली होती. या गुरांना केळीचे खोड खाण्यासाठी देण्यात आली होती यातील काही गुरांनी केळीचे खोड खाल्ल्याने त्यांच्या तोंडाला फेस येऊन गुरे खाली कोसळू लागली. या घटनेत 12 ते 15 गुरे दगावली तर अन्य गुरांना तातडीने केळीचे खोड खाण्यापासून वाचवण्यात आले. केळी खोड खाल्यामुळे विष बाधा होऊन ही गुरे दगावल्याची चर्चा घटनास्थळी होती. दगावलेली गुरे ही मजीद तबलदार तडवी, सलिम तबलदार तडवी, रफिक तबलदार तडवी,शेख हरून निजामुद्दील यांची होती, असे घटना स्थळावरून सांगण्यात आले.

शासकीय यंत्रणा न पोहोचल्याने संताप
दोन-तीन उलटून गेल्यावरही संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल न झाल्याने नागरीकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक रशीद तडवी, रईस मोमीन, डॉ.उमेश चौधरी व दक्षता समिती सदस्य रशीद बाबू तडवी यांनी घटनास्थळी भेट दिली. दगावलेल्या गुरांचा मंगळवारी ंचनामा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.