चार तोळ्यांची माळ बचावली ; 20 हजारांची रोकड केली लंपास
फैजपूर :- शहरातील गुरुदत्त कॉलनीतील रहिवाशी पप्पू ढाके यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 20 हजारांच्या रोकडसह तीन ग्रॅमचे कानातले व चांदीच्या साखळ्या लांबवल्या. असे असलेतरी अस्सल सोने समजून चोरट्यांनी नकली सोने लांबवले मात्र चोरीनंतर ही बाब लक्षात आल्याने त्यांनी घराजवळच पर्स फेकून पोबारा केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. गुरुदत्त कॉलनीतील रहिवाशी पप्पू ढाके यांचे वडील आजारी असल्याने त्यांना सावदा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडीलांजवळ झोपण्यासाठी मुलगा पप्पू ढाके हे रात्री मुक्कामी होते तर त्यांच्या पत्नी व मुल हे बाजूला त्यांच्या मोठ्या भावाच्या घरात झोपले होते.
सकाळी पप्पू ढाके यांच्या पत्नी सहा वाजता घरी आल्या असता त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. पहाटे 2 ते 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद बघून कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सामान फेकून पर्स मध्ये असलेले रोख 20 हजार व किरकोळ दागिने लंपास केले. उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम, उपनिरीक्षक आधार निकुंभ, कॉन्स्टेबल साळवे, मालवीय यांनी धाव घेतले. जळगावच्या श्वान पथकाने काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग दाखवला.
असली समजून नकली सोने केले लंपास, सोन्याची माळ बचावली
घरातील लोखंडी कपाटातून चोरट्यांनी सामानाची फेकाफेक करताना एक लहान पर्स सापडली. त्यात सोने असल्याचे समजून चोरटे ती पर्स घेऊन पळाले मात्र चोरीनंतर त्यात नकलीसोने असल्याचे कळताच त्यांनी पर्स घराजवळच फेकली तर पोलिसांनी सांगितल्यानंतर महिलांनी पर्सची तपासणी केली असता त्यात चार तोळे वजनाची सोन्याची माळ असल्याने मोठा दिलासा मिळाला.