फैजपूर : फैजपूर येथील कोविड सेंटरमधील कोरोना संशयीतांचे स्वॅब घेतलेल्या 80 नमुन्यांपैकी 23 जणांचे अहवाल गुरुवारी मध्यरात्री प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात कोरोना बाधित असलेल्या पोलिस अधिकार्याची कन्येसह दोन पोलिस अशा तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फैजपूर शहरातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडल्याने पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.
23 जणांचे अहवाल प्राप्त
गत आठवड्यात फैजपूर पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते तर दुसर्या दिवशी आणखी एकाला बाधा झाली होती त्यानंतर या पोलिस अधिकार्याच्या परीवारातील व संपर्कातील 13 पोलिसांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले होते तसेच अन्य अशा एकूण 80 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते त्यापैकी 23 जणांचे अहवाल प्राप्त झाले त्यात बाधीतांमध्ये पोलिस अधिकार्याच्या मुलीचा व दोन पोलिसांचा समावेश आहे. यातील बाधीत एक पोलिस भुसावळ येथे वास्तव्यास आहे त्याच प्रमाणे फैजपूर येथे दुसरा बाधीत पोलिस राहत असलेला परीसर पालिका प्रशासनाने सील केला आहे. दरम्यान, सहा पोलिसांसह एक होमगार्ड पोलिस अधिकार्याच्या परीवारातील अन्य सदस्य तसेच पोलिस अधिकार्यावर उपचार करणारे डॉक्टर, नर्स यांच्यासह 20 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.