फैजपूरात रात्री उशिरापर्यंत वनदाव्यांची पडताळणी

0

प्रलंबित असलेल्या वैयक्तिक दाव्यांचा जलदगतीने निपटारा

फैजपूर- फैजपूर उपविभागातील सातपुड्याच्या कुशीतील अनुसूचित जमाती व इतर पारंपारीक वनवासी अधिनियम अंतर्गत प्रलंबित असलेल्या वैयक्तिक दाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी 26 व 27 जून या दिवस सुरू असलेली आदिवासी भागातील वनमित्र मोहीम अंतर्गत यावल रावेर तालुक्यातील गावांच्या प्रलंबित वन दाव्यांची पडताळणीसाठी दुसर्‍या दिवशी बुधवारीही सुरू होती. सकाळी नऊ वाजेपासून या पडताळणीला स्वामी समर्थ मंगल कार्यालयात सुरुवात झाली. पडताळणी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती वनहक्क सहाय्यक कलेश हातकर यांनी दिली.

प्रांताधिकार्‍यांनी गावनिहाय घेतला आढावा
प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली या वन दाव्यासंदर्भात 26 व 27 जून या दोन दिवसात सर्व दाव्यांची पडताळणीचा निपटारा करायचा आहे. बुधवारी या पडताळणीला या संबंधित सर्व गावाचे वनपाल, वनरक्षक, ग्रामसेवक, तलाठी, समिती अध्यक्ष व सचिव उपस्थित होते. वनमित्र मोहीम अंतर्गत वैयक्तिक प्रलंबित असलेल्या दाव्यांचा जलद गतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्याची मुदत दिली. त्या अनुषंगाने या दाव्यांची पडताळणी केली जात आहे. प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी गावनिहाय परत आढावा घेतला व प्रलंबित वन दाव्यांच्या संदर्भात ग्रामस्थरीय वनहक्क समितीचे अध्यक्ष, सचिव व संबधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक, वनपाल, वनरक्षक यांच्यात समन्वय साधून वन दाव्यांचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी मार्गदर्शन केले.

12 अ प्रपत्र भरले नसल्याने दंड
रुईखेडा, वड्री, सावखेडासीम, गाडर्‍या, जामन्या, उसमळी,लंगडा आंबाया गावांनी 12 अ चे प्रपत्र भरले नसल्याने प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबाले यांनी एक हजार रुपये दंड तत्काळ भरण्याचे आदेश दिले.

बुधवारी एक हजार 334 दाव्यांची पडताळणी
सातपुड्याच्या कुशीतील गावांचे वनदावे जलदगतीने निपटारा होऊन आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारी एक हजार 334 दाव्यांची पडताळणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 26 रोजी ज्यांनी वनदावे आणले नाही त्यांची सुद्धा पडताळणी करण्यात आली होती. प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, नायब तहसीलदार पी.सी.धनगर, वनहक्क सहाय्यक कलेश हातकर, योगेश केदारे, तलाठी एस.एफ.खान, संजय राजपूत व भूषण कोळी यांनी कामकाज बघितले.

गावनिहाय आलेले दावे
सावखेडासीम- 24, रुईखेडा- 80, जामन्या- 18, लंगडा आंबा- 28, गाडरया -140, वड्री-21, उसमाळी-164, हिंगोणा-27, रावेर- निमड्या- 176, गारखेड-177, गारबर्डी- 121, लालमाती-7, सहस्रलिंग-34, पाल-13, जानोरी-21, तिड्या-65, अंधारमळी-54 व मोहमांडली-18