फैजपूरात 23 रोजी पांडुरंग रथोत्सव

0

भेटी लागे जिवा : 170 वर्षाची अखंडा परंपरा

फैजपूर : सुमारे 170 वर्षाची अखंड परंपरा लाभलेला येथील संतश्री खुशाल महाराज देवस्थानचा पांडुरंग रथोत्सव 23 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे तर 24 रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे. त्रिपुरारी पोर्णिमेच्या दिवशी साजरा होणार्‍या या रथोत्सवाची पूर्वतयारी देवस्थानातर्फे पूर्ण झाली आहे. या रथोत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण असून 1848 साली श्रीहरी महाराज यांनी निर्माण केलेल्या रथातून स्वयंभू विठ्ठलाच्या मूतीची मिरवणूक काढण्यास सुरवात झाली असल्याची माहिती आहे तर रथावर आरूढ होऊन भक्तांच्या भेटीला येणार्‍या पांडुरंगाची मूर्ती ही स्वयंभू व साक्षात असल्याची आख्यायिका आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रथोत्सव
23 रोजी कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हा रथोत्सव साजरा होणार आहे. या रथोत्सवाचे महाआरतीचे यजमान माजी नगराध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ हे असतील. दुपारी तीन वाजता महाआरती होऊन रथोत्सवाला प्रारंभ होईल. रथ गल्ली, लक्कड पेठ, कासार गल्ली, सुभाष चौक, खुशालभाऊ रोड या मार्गाने रथ मिरवणूक जाऊन पुन्हा रथ गल्लीत येईल. यादरम्यान मिरवणुकीत फैजपूर, कोसगाव, पाडळसा, बामणोद, चिनावल, न्हावी, सावखेडा, कळमोदा, पिंपरुळ, येथील भजनी मंडळी सहभागी होतील. रथोत्सव मार्गावर रांगोळी करणार्‍यांसाठी रांगोळी स्पर्धांचे आयोजन ही करण्यात आले आहे. विजेत्यांचे आकर्षक बक्षीस देऊन सत्कार करण्यात येणार आहे. 24 रोजी रात्री 7 ते 11 वाजेदरम्यान विठ्ठल-रुक्मिणीची पालखीतून मिरवणूक निघेल. 25 रोजी दुपारी चार वाजता पुन्हा पालखी मिरवणूक होऊन गणपतीवाडी येथे दहीहंडी होईल. 27 रोजी काकडा आरती समाप्तीनिमित्त पक्षाळ पूजा होईल, असे संत खुशाल महाराज देवस्थानचे गादीपती प्रवीण महाराज कळवतात.

अशी आहे आख्यायिका…!
स्वयंभू रथोत्सवाची आख्यायिका आहे. त्यात रंगारी कुटुंबात जन्मलेले संत खुशाल महाराज 12 व्या वर्षापासून विठ्ठलाचे निस्सीम भक्त असल्याने पायी पंढरपूर वारी करीत असत. 1721 साली वारीत त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाची मूर्ती घेण्याचे ठरविले त्यांच्या दृष्टीस एक विलोभनीय मूर्ती पडली. त्यांनी ती घेण्याचे ठरविले. मात्र पैसे नसल्याने ती ते घेऊ शकले नाही त्याचवेळी त्यांना पसंत पडलेली मूर्ती एका व्यापार्‍याने खरेदी केली. व्यथित खुशाल महाराजांनी पंढरीनाथाच्या गाभार्‍यात जाऊन विनवणी केली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी चंद्रभागा नदीत स्रान आटोपून ते कपडे बदलविण्यासाठी जवळील गाठोडे उघडले असता त्यांना पसंत पडलेली तीच मूर्ती गाठोड्यात होती. दुसरीकडे मूर्तीची चोरी झाली म्हणून व्यापारी शोधाशोध करीत होता. त्याचवेळी महाराजांजवळ मूर्ती सापडली. त्यांना चोरीच्या आरोपाखाली बंदिस्त करण्यात आले. बंदिस्तखान्यात त्यांनी विठ्ठलाचे नामस्मरण सुरू ठेवले. पुन्हा चमत्कार घडला तीच मूर्ती बंदिस्तखान्यात महाराजांजवळ आली. तेव्हा मात्र व्यापार्‍यांसह सर्वच हा चमत्कार पाहून थक्क झाले. त्यांनी खुशाल महाराजांची माफी मागून त्यांची मूर्तीसह पंढरपुरातून मिरवणूक काढली. तीच स्वयंभू पांडुरंग मूर्ती खुशाल महाराज देवस्थानात विराजमान आहे. 1772 मध्ये खुशाल महाराज यांंनी समाधी घेतली, ती गणपतीवाडी देवस्थानात आहे.