फैजपूर- फैजपूरसह परीसरात न्हावी, कारखाना, आमोदा, विरोदा, वढोदे भागात वादळामुळे केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने केळीचे झाडे झाडे कोसळून आडवी झाली यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. मंगळवारी रात्री झालेल्या वादळी तडाख्यात केळीसह मोठ-मोठी झाडे वीज तारांच्या खांबावर पडल्याने 20 तास वीज बंद होती. सावदा-फैजपूर रस्त्यावर झाडे कोसळुन रस्ता मार्ग बंद झाला होता यात रात्रीच रस्त्यावरील पडलेले झाडे हटवण्यासाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी जे.सी.बी पाठवून रस्त्यावरील झाडे बाजूला करीत वाहतुकीचा मार्ग खुला केला त्यामुळे वाहन चालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अधिकार्यांनी केली पाहणी
बुधवारी सकाळी संपुर्ण परीसरातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी यावल तहसीलदार कुंदन हिरे, तालुका कृषी अधिकारी के.सी.पाडवी, मंडळाधिकारी जे.डी.बंगाले, तलाठी फिरोज खान यांनी पाहणी केली. यावेळी तहसीलदार हिरे यांनी महसूल, कृषी विभागाच्या अधिकार्यांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या व शेतकरीबांधव यांनी विमा काढल्यास 48 तासात कळवावे, असे आवाहन यावेळी केले. बुधवारी दिवसभर महावितरणचे अभियंता धनंजय चौधरी यांनी आपल्या वायरमनसह शहरातील वाकलेले पोल व वीज तारा, पडलेली झाडे काढून दुपारी चार वाजता तब्बल 20 तासाने वीजपुरवठा सुरळीत केला. या वादळामुळे केळी, रस्त्यावरील झाडे, महावितरणचे मोठे नुकसान झाले.