फैजपूर प्रादेशिक वनक्षेत्राचे वनपाल यांचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल : शहरातील रहिवासी तथा फैजपूर प्रादेशिक वनक्षेत्राचे वनपाल असलम खान मजीत खान (44) यांचा बुधवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. गत फेब्रुवारी महिन्यात चोपडा-अमळनेर रस्त्यावर त्यांचा अपघात झाला होता व तेव्हापासून त्यांच्यावर सुरवातीला खाजगी व नंतर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

वनपाल अपघातात झाले जखमी
यावल शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या अक्सा नगरातील रहिवासी तथा प्रादेशिक वनविभाग पूर्व क्षेत्रातील फैजपूर येथील वनपाल असलम खान मजीत खान (44) हे 10 फेब्रुवारी रोजी दुचाकीव्दारे अमळनेर येथून यावलकडे येत असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चोपडा-अमळनेर रस्त्यावरील धरणगाव चौफुलीवर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांच्यावर आधी खाजगी व नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, चार बहिणी असा परीवार आहे. त्यांच्यावर लक्ष्मीनगर कानळदा रोड, शिवाजी नगर, जळगाव येथे बुधवारी सायंकाळी अंत्यविधी करण्यात आला.