फैजपूर मंडळाधिकार्‍यांच्या वाहनाला डंपरने उडवण्याचा प्रयत्न

माजी नगराध्यक्ष पिंटू राणेंवर मंडळाधिकार्‍यांचा संशय : पोलिसात गुन्हा दाखल

फैजपूर : तालुक्यातील फैजपूर येथील मंडळाधिकारी एम.एच.तडवी हे बुधवारी रात्री चारचाकी वाहनाने तालुक्यातील सावखेडा येथे जात असताना विरावली गावाजवळ समोरून येणार्‍या डंपरने त्यांच्या वाहनास जोरदार धडक देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला मात्र या प्रकारामागे फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांच्यावर तडवी यांनी संशय व्यक्त करीत त्या आशयाची तक्रार यावल पोलिसात नोंदवली आहे.

माजी नगराध्यक्षांवर संशय
मंडळाधिकारी एम.एच.तडवी (53) यांनी यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी ते मुलगा बिलाल तडवीसह फैजपूर येथून काम आटोपून सावखेडासीम, ता.यावल येथे चारचाकी (क्रमांक एम.एच.19 सी.झेड. 6423) व्दारे जात होते. रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास विरावली गावापुढे कब्रस्तानच्या अलीकडे दहिगावकडून भरधाव वेगाने येत असलेला डंपरने मंडळाधिकार्‍यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जबर धडक दिली. यावेळी बचावासाठी वाहन रस्त्याच्या कडेला उतरवण्यात आले तर डंपर चालक वाहनासह पसार झाला. या अपघातात वाहनाचे 25 हजारांचे नुकसान झाले. मंडळाधिकारी तडवी यांच्या आरोपानुसार जीवे ठार मारण्याचा उद्देशाने हा अपघात फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू मुरलीधर राणे याने घडवून आणला. अधिक तपास प्रभारी अधिकारी आशीत कांबळे करीत आहे.

आरोप तथ्यहीन : पिंटू राणे
माझा रेतीचा व्यवसाय नाही वा माझ्याकडे डंपरदेखील नाही मात्र असे असताना मंडळाधिकार्‍यांनी आपल्यावर केलेले आरोप निरर्थक व हास्यास्पद आहेत. मंडळाधिकारी कार्यालयात थांबत नसल्याने दोन दिवस आपण त्यांच्या अनुपस्थितीतबाबत फेसबुकवर लाईव्ह माहिती दाखवली व त्यामुळे व्यथीत होवून त्यांनी आपल्यावर आरोप केला आहे. कुठल्याही वाळू वाहतूकदाराशीदेखील आपला काडीमात्र संबंध नाही, चौकशीला सामोरे जावू, सत्य समोर निश्चित येईल, असेही राणे म्हणाले.