फैजपूर मंडळाधिकार्‍यांविरोधात खंडणीचा गुन्हा

खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी केली 50 हजारांची मागणी

यावल : फैजपूर मंडळाधिकारी हनीफ तडवी यांच्या चारचाकीला अज्ञात डंपरने धडक देवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा प्रकार फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश ऊर्फ पिंटू राणे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप तडवी यांनी करीत यावल पोलिसात गुन्हा दाख केला होता तर मंडळाधिकारी तडवी यांनी खोटा गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजारांची खंडणी मागितली होती, असा आरोप करीत राणे यांनी फैजपूर पोलिसात तक्रार दिल्यानंतर तडवी यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मंडळाधिकार्‍यांच्या वाढल्या अडचणी
यावल पोलिस ठाण्यात फैजपूरचे मंडळाधिकारी हनीफ तडवी हे मुलासह चारचाकी प्रवास करीत असताना एका डंपरने तडवी यांच्या वाहनाला धडक देण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने वाहन रस्त्याच्या कडेला उतरवल्याने अपघात टळला होता मात्र हा सर्व प्रकार माजी नगराध्यक्ष पिंटू राणे यांच्या सांगण्यावरून घडल्याचा दावा तक्रारीत तडवी यांनी केला होता तर फैजपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनीदेखील याच संदर्भात शुक्रवारी फैजपूर पोलिस ठाण्यात फैजपूर मंडळाधिकारी हनीफ तडवी यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. तक्रारीचा आशय असा की, मंडळ अधिकारी तडवी यांनी बुधवारी रात्री फोन करून तुम्ही माझ्या वाहनाला डंपरकरवी धडक देण्याचा प्रयत्न केला असून आता मला 50 हजार रुपये द्यावेत अन्यथा मी तुमच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करेल, अशी धमकी दिली होती मात्र आपल्याकडे डंपर नाही व आपण केलेलेदेखील नाही, असे सांगून तडवी यांनी ऐकले नाही व आपल्याविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शासकीय अधिकारी विरोधात राजकीय पदाधिकारी यांच्यात रंगलेल्या शीत युद्धानंतर यावल तालुक्यात वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.