पाणीपुरवठा नियोजनात हस्तक्षेप न करण्याबाबत बजावले पत्र
फैजपूर- पाणीपुरवठा विभागात नगरसेविका पतीकडून होणारा हस्तक्षेप व कर्मचार्यांना अरेरावी होत असल्याने पालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा ओगले-शिंदे यांनी नगरसेविका शेख नफीसा बी.इरफान यांचे पती शेख इरफान यांच्यासह नगरसेविका मोमीन फातेमा बानो रईस यांचे पती रईस मोमीन तसेच नगरसेविका मलक साईमबी आबीद यांचे पती मलक आबीद यांचे लेखी पत्रान्वये कान टोचले आहेत. त्यांच्या या पत्रामुळे पालिकेच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे तर पालिका कारभारात नगरसेविका पतींचा होणारा हस्तक्षेप यामुळे थांबण्याची आशाही व्यक्त होत आहे.
वैयक्तिक हस्तक्षेपामुळे टोचले कान
मुख्याधिकार्यांनी तीनही नगरसेविका पतींना दिलेल्या पत्रानुसार पाणीपुरवठा वितरणात त्यांचा हस्तक्षेप वाढला असून त्यांनी कर्मचार्यांनी सभ्यतेने बोलावे व वैयक्तिक हस्तक्षेप टाळणे गरजेचे असून पालिका कर्मचार्यांशी ज्या असभ्यतेने ते बोलत आहेत ती बाब चुकीचे असल्याचे 29 रोजी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. आपण नगरसेविकेचे पती असून सुजाण नागरीक असल्याने पाणीपुरवठा नियोजनात कुठलाही हस्तक्षेप करू नये, काही समस्या असल्यास कार्यालयात येऊन त्याचे निरसन करावे व आमच्या विनंतीचा मान ठेवावा, अशी मार्मिक कोपरखळी देखील पत्रान्वये मारण्यात आली आहे.