फैजपूर रस्त्यावर दुचाकींचा अपघात : चोपड्यातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

यावल : दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात दोघे दुचाकीस्वार जखमी झाले होते. त्यातील चोपडा येथील दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटेपूर्वी खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. अब्दुल हफिस अब्दुल हमीद (45, रा.मन्यार गली, चोपडा) असे मयताचे नाव आहे.

भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्या
यावल-फैजपूर रस्त्यावर सांगवीजवळील पेट्रोल पंपाजवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एम.एच.15 बी.बी.8833) व (दुचाकी एम.एच.39 एक्स.0576) यांच्यात अपघात होवून छोटू बारेला (32, रा.रावेर) व अब्दुल हफिस अब्दुल हमीद (45 रा.मन्यार गली, चोपडा) हे गंभीर जखमी झाले. दोघांवर प्रथमोपचार करण्यात आल्यानंतर अब्दुल हाफिज यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले व तेथून पुन्हा खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटे पूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.