फैजपूर विभागातील 242 बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांचे अनुदान पडून

0

25 सप्टेंबरपर्यंत बँक खात्यांचा तपशील न दिल्यास अनुदान जाणार परत

फैजपूर- बोंडअळी कापूस उत्पादकांनी शासकीय मदतीसाठी बँक खात्यांचा तपशील 25 सप्टेंबरपर्यंत न दिल्यास अनुदान परत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 2017-18 या खरीप हंगामातील कापूस पेरणी केलेल्या शेतकर्‍यांच्या कापूस पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी नुकसान भरपाई मिळावी व शासकीय मदत मिळावी यासाठी मागणी केल्याने पंचनामे करण्यात आले. नुकसान भरपाईचे अनुदान यावल तहसील कार्यालयात पडून आहे. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर हे अनुदान जमा करण्यासाठी शेतकर्‍यांच्या बँक खात्याचा तपशील नसल्याने अडचणी वाढल्या आहेत शिवाय बँक खात्याअभावी शासनाचे हे अनुदान परत जाऊ नये म्हणून 6 रोजी फैजपूर पालिका सभागृहात दुपारी तीन वाजता फैजपूर मंडळाधिकारी जे.डी.भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकर्‍यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

242 शेतकर्‍यांनी माहिती दिलीच नाही
मंडळ अधिकारी यांनी 25 सप्टेंबरपर्यंत कापूस बोंडअळी ग्रस्त शेतकर्‍यांनी आपले बँक खात्यांचा तपशील तलाठी कार्यालयात जमा करावा तसेच ज्यांनी खाते उघडले नसल्याने त्यांनी खाते उघडून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. बँक खात्याची माहिती मुदतीत न दिल्यास अनुदान शासन जमा होणार असल्याचे प्रसंगी सांगण्यात आले. फैजपूर शिवार एकूण पंचनामे 439 करण्यात आले होते. त्यापैकी अद्याप पावेतो 242 नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांनी बँक खात्याची माहिती दिलेली नाही. जिरायतीसाठी सहा हजार 800 रुपये हेक्टरी मदत तर बागायतीसाठी 13 हजार 400 रुपये हेक्टरी मदत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उपनगराध्यक्ष कलीम खान हैदर, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे उपस्थित होते. बैठकीला जिल्हा दूध संघ संचालक हेमराज चौधरी, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, देवेंद्र साळी, चंद्रशेखर चौधरी, रवींद्र होले, पप्पू चौधरी, भाजप शहराध्यक्ष संजय रल, काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद कौसर अली, शेख इरफान, राकेश जैन यांच्यासह शहरातील शेतकरी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी तलाठी एफ.एस.खान, डी.एल.तायडे, संजय राजपूत, आमोदे तलाठी एम.पी.खुर्दा यांनी परीश्रम घेतले.