फैजपूर साखर कारखान्याचा फड पेटण्याची चिन्हे !

0

भुसावळ । विविध आश्‍वासनांची पूर्ती न करणार्‍या संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराविरूध्द आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासह अन्य सदस्यांनी फैजपूर साखर कारखान्याच्या रविवारी होणार्‍या सभेवर बहिष्कार टाकल्याने ही सभा होते वा नाही? याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. 2014-15 गळीत हंगामात 1 हजार 696 रुपये टन ऊसाला भाव देत उत्पादकांची फसवणूक करण्यात आली व 145 रुपये भाव कमी देत एफआरपी कायद्याचा भंग झाला यासह विविध आश्‍वासने देऊनही त्याची पूर्तता संबंधितानी न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याचा फड पुन्हा एकदा पेटण्याची चिन्हे आहेत.

आमदार हरिभाऊंसह अनेकांचा बहिष्कार
2014-15 व 2015-16 वर्षात सभासदांना साखर वाटप झाली नाही तसेच ऊस उत्पादकांना ऊस पुरवठ्यावरील टनेजाची साखर दिली गेली नाही. संस्थापक कै.दादासाहेब जि.तु.महाजन यांनी सुरू केलेल्या परंपरेला विद्यमान चेअरमन शरद महाजन व संचालक मंडळाने छेद दिला असून सभासदांचा विश्‍वासघात केला आहे. 2016-17 वर्षात साखरेला सरासरी 3335 प्रतिक्विंटल भाव मिळाला तर अल्कोहोलला 36 रुपये प्रतिलिटर मिळाले मात्र 2 हजार 100 रुपये भाव दिला गेला. बहिष्काराच्या निवेदनावर आमदार हरिभाऊ जावळे, हर्षल गोविंदा पाटील, हिरालाल चौधरी, सुरेश धनके, पांडुरंग सराफ, नारायण चौधरी, राकेश फेगडे, विलास पाटील, विलास चौधरी, डॉ. रमेश चौधरी, डॉ.नरेंद्र कोल्हे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

2014-15 साली कारखान्याला प्रचंड तोटा झाल्याने आर्थिक स्थिती बिघडली. अर्थव्यवस्थेवर परीणाम झाला असून एफआरपीबाबत आयुक्तांच्या निर्देशाचे पालन करीत आहोत. मायनस नेटवर्क झाल्याने साखर वाटप केली जात नाही ती वाटप व्हावी, असे आम्हालाही मनापासून वाटते. रविवारची सभा निश्‍चित होईल.
– शरद महाजन
चेअरमन, मधुकर सहकारी साखर कारखाना, फैजपूर