फोटोच्या आधारे तरुणीवर बलात्कार

0

सांगवी : दहा वर्षांपूर्वीच्या ओळखीचा फायदा घेत आयटी अभियंता तरुणीचे तिच्या नकळत अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्याआधारे तिचे ब्लॅकमेलिंग करून तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिच्या नावावरील संपत्तीचा काही भाग बक्षीसपत्र स्वरूपात देण्यास भाग पाडले. हा धक्कादायक प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला. याप्रकरणी 29 वर्षीय पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शीबू सिद्दीकी आणि रक्षी सिद्दीकी (दोघे रा. गोविंदपूर कॉलनी, अलाहाबाद, उत्तर प्रदेश) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी हिंजवडी येथे एका आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून नोकरी करते. 2008 साली आरोपी आणि त्याचा भाऊ अलाहाबाद येथील एका क्लासमध्ये शिकत होते. त्याच क्लास मध्ये पीडित तरुणी शिकत होती. तेंव्हापासून पीडित तरुणी आणि आरोपी एकमेकांना ओळखत आहेत. त्या ओळखीचा फायदा घेत आरोपी शीबू याने पीडित तरुणीचे अश्‍लील फोटो आणि व्हिडिओ काढले. त्याद्वारे शीबू याने तरुणीला ब्लॅकमेल केले व तिच्यावर बलात्कार केला. तसेच काढलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले. पीडित तरुणी राहत असलेल्या फ्लॅटमधील अर्धा हिस्सा आरोपींनी बक्षीस पत्र म्हणून लिहून घेतला. या संपूर्ण प्रकरणात आरोपी शीबू याची पत्नी रक्षी हिने देखील साथ दिली. यावरून पीडित तरुणीने सांगवी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.