हिंजवडी : फ्लॅट स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी करत पतीने पत्नीला मारहाण केली. तसेच पत्नीच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे भाडे तिने पतीकडे जमा करावे, अशी अनोखी मागणी पतीने केली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 32 वर्षीय महिलेने हिंजवडी ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला हिंजवडी येथे नोकरी करते. तिच्या नावावर हिंजवडी येथे फ्लॅट आहे. त्यामध्ये फिर्यादी महिला आणि तिचा आरोपी पती राहत आहेत. मागील काही दिवसांपासून पतीने पत्नीच्या नावावरील फ्लॅट स्वतःच्या नावावर करून देण्याची मागणी केली. तसेच पत्नीने तिच्याच घरात राहण्यासाठी पतीकडे घरभाडे जमा करावे, अशी देखील अनोखी मागणी केली. या कारणावरून पतीने पत्नीला वेळोवेळी पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सोमवारी (दि. 19) रात्री साडेनऊच्या दरम्यान पतीने पत्नीच्या डोळ्यावर जोरात मारले, तसेच त्यांचे केस धरून डोके भिंतीवर आदळले. यामध्ये फिर्यादी महिला जखमी झाल्या. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.