बँकांमध्येही आधार केंद्राची सुविधा : जिल्हाधिकार्‍यांचे आदेश

0

पुणे । प्रत्येक बँकेने त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार केंद्र सुरू करावे, असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील बँकांनी आधार मशीन कार्यान्वित करून घ्यावीत. बँकेमध्ये आधार नोंदणी व दुरुस्तीची कामे करण्याबाबतचा फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बँकांना दिले आहेत. केंद्र शासनाच्या आदेशानुसार विविध खात्यांना आधार कार्डाची जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर बँकांनीही त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा आदेश केंद्र शासनाने दिला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र शासनाकडून 129 आधार मशीन पुरविण्यात आल्या आहेत. मात्र, केंद्राच्या या निर्णयाला बँकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

बँकांचा जिल्हाधिकार्‍यांकडून आढावा
केंद्र शासनाने हा उपक्रम सुरू केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी 129 आधार यंत्रे पुरविली आहेत. ही यंत्रे जिल्ह्यातील 129 विविध बँकांच्या शाखांमध्ये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही, यासाठीचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या बॅकांची बैठक घेऊन याबाबतचे आदेश दिले आहेत.

सुविधा सर्व नागरिकांसाठी
जिल्ह्यातील 57 बँकांमध्ये आधार मशीन देण्यात आली आहेत. तसेच या 57 बँकांमध्ये सुरू असलेल्या आधार यंत्रांवर केवळ संबंधित बँकांच्या खातेदारांची आधार नोंदणी आणि दुरूस्तीचे कामे बँकांकडून केली जातात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ही आधार मशीन सर्व नागरिकांसाठी असून सार्वजनिक आधार केंद्रांप्रमाणेच या ठिकाणी नागरिकांची आधारची कामे करण्यात यावीत, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.