बँक ऑफ महाराष्ट्राचा तोटा वाढला!

0

पुणे । बँक ऑफ महाराष्ट्रवर लवकरच तातडीने सुधारणात्मक कारवाई (प्रॉम्प्ट करेक्टिव्ह अ‍ॅक्शन) घेण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून, या महाबँकेचा तोटा तब्बल 1372 कोटींच्या घरात गेला आहे. बँकेने अनागोदी पद्धतीने वाटप केलेली कर्जे, बुडित खात्यात गेलेली रक्कम आणि एकूणच बँकेच्या आर्थिक बेशिस्तीवरून ही कारवाई करण्याचा आरबीआयचा मनोदय आहे. पीसीएच्या कारवाईखाली येणारी महाबँक ही आता सहावी बँक ठरणार असून, यापूर्वी सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, युको बँक, देना बँक आणि इंडियन ओव्हरसिज बँक या बँकांवर अशाप्रकारची कारवाई करण्यात आलेली आहे.

वर्ष 2016-17 मध्ये महाबँकेला 1372 कोटींचा तोटा
बँक ऑफ महाराष्ट्राचा 2016-17 या आर्थिक वर्षात तब्बल 1372 कोटींचा वित्तीय तोटा नोंदविण्यात आलेला आहे. तसेच, बँकेचा एनपीए हा 16 टक्क्यांहून जास्त झालेला आहे. थकित कर्जे वाढल्याने बँकेची अर्थस्थिती चांगलीच अडचणीत सापडलेली आहे. बँकेचे व्यवहार सुरुळीत रहावे, ग्राहकांचा बँकांवरील विश्वास कायम रहावा म्हणून आरबीआय शक्यतोवर पीसीएअंतर्गत कारवाई करण्याचे टाळते. परंतु, बँकांचा आर्थिक बेशिस्तपणा उदंड झाल्यानंतर मात्र त्यांच्यावर अशाप्रकारच्या कारवाईशिवाय अन्य पर्याय राहात नाही, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. बँक ऑफ महाराष्ट्रचे ढिसाळ व्यवस्थापन आणि खालावलेली आर्थिक प्रकृती लक्षात घेता, पीसीएअंतर्गत कारवाईचा विचार आरबीआयने सुरु केला असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले.

मनमानी कर्जवाटप, कर्जवसुलीचे अपयश भोवणार
मार्च 2017 अखेर बँक ऑफ महाराष्ट्राचा नेट परफॉर्मिंग असेट (एनपीए) हा तब्बल 11.76 टक्क्यांवर पोहोचला होता. तर कर्जवसुली दर कमालीचा घसरलेला होता. चौथ्या सहामाईत बँकेला 455.40 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. तर संपूर्ण अर्थवर्षात बँकेला 1372 कोटींचा तोटा झालेला आहे. आर्थिक गैरशिस्त, कर्जवाटपातील मनमानी आणि कर्जवसुलीत आलेले अपयश यामुळे बँक ऑफ महाराष्ट्रसारखी चांगली बँक अडचणीत सापडलेली आहे.