अप कर्नाटक एक्स्प्रेसमधील घटना ; जिल्हाधिकार्यांची तत्परता
भुसावळ- लष्करातील सेवानिवृत्त कर्नलचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना अप कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये भुसावळ रेल्वे स्थानक येण्यापूर्वी शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेपूर्वी घडली. मुथप्पा माचया पांडा उर्फ पी.एम.मुथप्पा (55, रा.बंगळूर) असे मयत सेवानिवृत्त कर्नलचे नाव आहे. पत्नी कमला व मुलगी ऋतिकासह भोपाळ येथे लष्कराच्या स्थापनादिन कार्यक्रमातून परतताना ही दुर्दैवी घटना घडली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी मृतदेह हलवण्यासह तातडीने शवविच्छेदनकामी प्रशासनाने तातडीने आदेश देत माणुसकीचे दर्शन घडवले.
शौचालयातच आढळला मृतदेह
भोपाळ येथे नोकरी झाल्याने लष्कराचा रेझींग डेनिमित्त पांडा यांना आमंत्रीत करण्यात आल्यानंतर सेवानिवृत्त कर्नल पांडा हे पत्नी कल्पना व मुलगी ऋतिकासह गेले होते. शनिवारी ते अप कर्नाटक एक्स्प्रेसच्या एच- 1 डब्यातून प्रवास करीत असताना शौचालयाला गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. बराच वेळ झाल्यानंतरही पांडा न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता शौचालयातच त्यांचा मृतदेह आढळला. भुसावळ आरपीडी डेपोचे कर्नल सुनील कदम तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांना माहिती कळवण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी प्रशासनाला तातडीचे मदत करण्याचे आदेश दिले. भुसावळचे नायब तहसीलदार संजय तायडे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत आर.तायडे, लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिलीप गढरी यांनी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक तीनवर धाव घेतली. लष्कराच्या वाहनातून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. याप्रसंगी रेमंडला सुरक्षा अधिकारी गिरीधारी कुर्वे यांनीही जावून माहिती घेतली. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह लष्कराच्या वाहनाने पुणे व तेथून विमानाने बंगळूर येथे हलवण्यात आल्यानंतर रविवारी वा सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.