बंग बांधव आणि लष्करी प्रशासनाच्या वतीने उत्सवाचे आयोजन
देहूरोड : देहूरोड परिसरातील इंद्रायणीदर्शन येथे बंगाली बांधवांच्या बंगीया क्रिष्टी परिषदेच्या वतीने यंदा भरविण्यात आलेल्या दुर्गा उत्सवात दुर्गामातेच्या पूजेला वाजविण्यात येणारे पारंपरिक वाद्य ‘ढाकेर’च्या प्रतिकृतीचा देखावा उभारण्यात आला आहे. सुमारे 50 फूट उंच आणि 72 फूट लांबी व 30 फूट रुंदीच्या आकाराचा उभारण्यात आलेला हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून बंग बांधवांसह स्थानिक नागरिक गर्दी करू लागले आहेत.
उत्सवाचे यंदाचे 44 वे वर्ष
बंगीया क्रिष्टी परिषदेच्या वतीने दरवर्षी या ठिकाणी दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात येते. उत्सवाचे यंदा 44 वे वर्ष आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी कोलकाता येथील सहा कलाकार सुमारे दीड महिन्यांपासून काम करीत होते. बांबूच्या सांगाड्यावर विशिष्ट प्रकारातील कापड लावून त्यावर साच्यात तयार केल्या कलाकुसरीच्या नक्षीदार पट्ट्या लावून हा देखावा तयार करण्यात आला आहे, अशी माहिती दुर्गापूजा उत्सव समितीचे अध्यक्ष अमित मुखर्जी आणि सचिव प्रितीश बनिक यांनी दिली. हा देखावा उभारण्यासाठी अंदाजे आठ लाख रुपये खर्च आला असून दुर्गा, गणेश, महिषासूरमर्दिनी आदी देवतांच्या मूर्तींची या मंडपात स्थापना करण्यात आली आहे. या सर्व मूर्ती खास बंग कलाकुसरीत कोलकाता येथील मूर्तीकारांकडूनच तयार करून घेतल्या जातात.
30 सप्टेंबरपर्यंत उत्सव चालणार
दरवर्षी मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन हे कलाकार येथे येतात. खडकी येथे या मूर्ती तयार करण्याचे काम चालते, अशी माहिती संयोजकांनी दिली. या कार्यक्रमाचे आयोजन बंग बांधव आणि लष्करी प्रशासनाच्या वतीने करण्यात येते. सोमवारी या दुर्गोत्सवाचा प्रारंभ झाला. या ठिकाणी रोज सकाळी 9 ते 12 यावेळेत पूजा तर दुपारी 12 ते 1 या वेळेत पुष्पांजलीचा कार्यक्रम होणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हा उत्सव सुरू राहणार असून, 30 तारखेला भव्य मिरवणूकीनंतर देहू येथे दुर्गा विसर्जन होणार आहे.