बंदमुळे दिवसभर शहरात तणावाचे वातावरण

0

पुणे । भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. रास्ता रोको, दगडफेक असे प्रकार घडले. दिवसभर शहरात तणावाचे वातावरण राहिले. बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. मंगळवारी रात्रीसुद्धा गस्त वाढवली होती. बुधवारी सकाळी व्यवहार सुरळीत चालू झाले. पीएमपी बससेवा चालू होती. रिक्षा धावत होत्या. मात्र शाळा बंद राहिल्या, अनेक पालकांनीच मुलांना शाळेत पाठविले नाही. स्वत:च्या जबाबदारीवर मुलाना पाठवावे असे सूचना फलक काही मराठी माध्यमाच्या शाळांनी लावले होते.

स्कूल बस बंद
इंग्रजी माध्यमाच्या शाळात परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या.जवळपास 90 टक्के शाळा बंद राहिल्याने रस्त्यावर दिवसा वाहनांची गर्दी कमी होती. स्कूल बसचालकांनी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवली. त्यामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. शहरातील लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्त्ता, शिवाजी रस्ता आणि बाजारपेठात सकाळी व्यवहार चालू झाले, परंतु सकाळी 10 वाजल्यानंतर विविध भागातून मोर्चे निघाले आणि बंदचे आवाहन केले गेले तसे दुकाने बंद होत गेली. रस्त्यावर तुरळक गर्दी होती. त्यामुळे बाजारपेठाही सकाली 11 वाजल्यानंतर बंद होत गेल्या. दुकानांमधील कामगार वर्ग, कार्यकर्ते चौका चौकात गटाने जमून गप्पा मारत उभे होते. मात्र शहरात अन्यत्र घडत असलेल्या घडामोडींवर लोकांचे लक्ष राहिले. सोशल मिडीयावर समाज विघातक संदेश प्रसारित केल्यास कारवाई करू असा इशारा पोलीस खात्याने दिला, त्याचा परिणाम दिसून आला.

भीमसैनिकांच्या मोर्चाने दांडेकर चौक ब्लॉक
महाराष्ट्र बंदच्या हाकला प्रतिसाद देत पुण्यातील दांडेकर चौकात भीमसैनिकांनी रास्ता रोको केला आहे. मोर्चेकरांनी संपूर्ण चौक ब्लॉक केला असून या रस्त्यावरील सर्व वाहतूक मोर्चामुळे बंद झाली आहे. भीमसैनिकांचा मोठा मोर्चा असून घोषणाबाजी करण्यात येत आहे. जवळपास मागील तासाभरापासून ही परिस्थिती असून काही वेळाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.मोर्चामुळे दांडेकर पुलावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगडफेकीच्या पार्श्‍वभूमीवर पुणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या परिसरात शहरातील आंबेडकर वादी संघटनानी एकत्र येत आज (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला स्कूल बस असोसिएशनने पाठिंबा देत आज स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर अनेक शाळांनी सुट्ट्या दिल्या आहेत. काही शाळा सुरू आहेत मात्र पटसंख्या कमी पालकांनी मुलाना घरी ठेवणे केलं पसंत शहर व उपनगरात कडकडीत बंद. अनेक शाळांना कल्पना नसल्याने अनेक विद्यार्थी शाळेच्या गेट वरून परत घरी महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर वारजे माळवाडी परिसरात स्कूल बस, व्हॅन , रिक्षाने शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना परत पाठविले.

दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू : पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला
ज्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले, त्या दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे, असे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले. शहरात शांततेत बंद पाळण्यात आला. शहरात दिवसभरात 18 बसगाड्या वर दगडफेक, एकूण 70 छोटे-मोठे मोर्चे निघाले. तर भीमा कोरेगावच्या घटनेस कारणीभूत असणार्‍या मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी काल केली होती. या प्रकरणी एकबोटे व भिडे यांच्यावर येरवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यास विविध संघटनांनी पाठिंबा देत भीमा कोरेगाव येथील घटनेचा निषेध नोंदवला. काही घटना वगळता शहरात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले. दिवसभरात 18 गाड्यांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले. पीएमपीच्या सरासरी 50 ते 55 बसेसचे नुकसान झाल्याचे समजते. रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न झाला, 21 ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दांडेकर पूल, अपर इंदिरानगर, पिंपरी, ताडीवाला रोड, चंदननगर येथील परिसर संवेदनशील असल्याने बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. स्वत: शुक्ला यांनी सकाळी शहरात फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. सायंकाळनंतर 80 टक्के बंदोबस्त कमी करण्यात आला.

अत्यावश्यक सेवा सुरळीत
वीज, पाणी अशा अत्यावश्यक सेवा सुरळीत चालू राहिल्या, दवाखाने, रुग्णालयाच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला नाही. रेल्वे वाहतूक चालू होती मात्र प्रवाशांची संख्या घटली होती.

लष्कर भागात जादा पोलिस बंदोबस्त
हडपसर, दांडेकर पूल, लष्कर भाग तेथे जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ताडीवाला रस्ता, नरपतगीर चौक, आरटीओ कार्यालय येथे रस्ता रोको झाल्याने अनेकवेळा वाहतूक ठप्प झाली होती. ताडीवाला रस्ता येथे दगडफेकीचे प्रकार घडले. लोहियानगर परिसरातून मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर भवानी पेठ, नेहरू रस्ता येथील व्यवहारही दुपार नंतर मंदावले. सिंहगड रस्त्यावर पीएमपी बसग्गाद्या जमावाने थांबविल्या, प्रवाशांना उतरावयाला लावले आणि गाडीच्या चाकातील हवा सोडून दिली. पीएमपीवर दगडफेकीचे प्रकार घडल्याने अनेक मार्गावरील बससेवा ठप्प झाली होती. बस आणि रिक्षासेवा तुरळक झाल्याने बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. औरंगाबाद, कोल्हापूर, लातूरकडे जाणारी एसटीसेवा विस्कळीत झाल्याचा फटका पुण्यात अनेक प्रवाशांना बसला.

मांजरीला पोलीस छावणीचे स्वरूप

हडपसर । कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत असतानाच आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी परिसरात मोर्चा काढल्याने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनीही मोर्चाचे आवाहन केले. त्यामुळे महादेवनगर मांजरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी हडपसर पोलीसांनी लागलीच त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. सकाळी महादेवनगर परिसरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत होता. त्याचवेळी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या एका गटाने रस्त्याने घोषणा देत मोर्चा काढला होता. काही व्यावसायिकांना दुकाने बंद करायला लावली.

काही दुकानांमध्ये जाऊन मोर्चेकर्‍यांनी जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. किरकोळ दगडफेकीचे प्रकारही घडले. त्यामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते हळूहळू एकत्र होऊन त्यांनीही घोषणा द्यायला सुरुवात केली. कार्यकर्ते वाढू लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, पोलीसांनी वेळीच दखल घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली. हडपसर पोलीसांची एक तुकडी महादेवनगरमध्ये दाखल झाली होती. दरम्यान, पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त मिलिंद पाटील व विष्णू पवार यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावून शांतता राखण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनीही त्याला प्रतिसाद देत मांजरी पर्यंत मोर्चा काढला. तसेच एकमेकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. विविध व्यवसायिकांसह शाळा, महाविद्यालये बंदमध्ये सहभागी झाल्याने दररोजच्या तुलनेत रस्त्यावरील वाहतूक शांत होती. अनेक नागरिकांनी रस्त्यावर येणे टाळल्याने संपूर्ण परिसरातच शुकशुकाट जाणवत होता.

दोषींवर गुन्हे दाखल करणार