‘बंद’ला ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे । महाराष्ट्र बंदला पुणे जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. बारामती, यवत, इंदापूर, शिरूर, शिक्रापूर, दौंड, सणसवाडी, वालचंदनगर, जुन्नर भागात बुधवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. बारामतीतील सर्व दुकाने चहा टपर्‍या तसेच इतर सर्व आस्थापने 100 टक्के बंद होती. त्याचप्रमाणे बारामती बस आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. प्रवाशांना याची आगोदरच कल्पना असल्याकारणाने प्रवासी बसस्थानकाकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे बसस्थानकावर शुकशुकाट होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. मोर्चात महिलांचा सहभाग मोठा होता.

बारामतीत 4 कोटींचे व्यवहार ठप्प
बारामती बसस्थानकात नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील विद्याप्रबोधिनी या प्रशालेच्या सहलीच्या दोन बसेस थांबविण्यात आल्या. या बसमध्ये 95 विद्यार्थी-विद्यार्थीनी होत्या. त्यांच्यासाठी चहा नाष्ट्याची तसेच दुपारच्या जेवणाची सोय बारामती बस आगारातील चालक वाहकांनी वर्गणी गोळा करून केली. माणुसकीचे चांगले दर्शन येथे घडले. बारामती बस आगारातून एकही बस बाहेर न पडल्यामुळे जवळपास 45 लाखांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे शहरातील सर्व दुकाने बंद असल्यामुळे संपूर्ण व्यवहार बंद होते. भाजी मंडईतील व्यवहारही पूर्णपणे बंद होते. 4 कोटींचे व्यवहार ठप्प झाले होते. विशेष म्हणजे सर्व हॉटेल्स बंद असल्यामुळे चहासह कोणतीही सोय नागरीकांना उपलब्ध झाली नाही. त्याचप्रमाणे मजूर अड्ड्यावरील मजूरदेखील काम न मिळाल्यामुळे निराशेने घरी परत गेले. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शाळा, महाविद्यालयेदेखील ओस पडली होती.

भवानीनगर येथे दगडफेक
वालचंदनगरमध्येही कडकडीत बंद पाळण्यात आला. बी.सी.ए. या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने सोमवारीच पालकांना मोबाईलवर संदेश देत शाळेला सुट्टी जाहीर केली. मराठी माध्यमाच्या श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात काही विद्यार्थी हजर होते. त्यांना वाहतुकीच्या कारणावरून घरी पाठविण्यात आले. भवानीनगर येथे झालेल्या दगडफेकीत अकलूज-नाशिक या एसटीचे नुकसान झाले.

भिमनगर पाडळी येथे निषेध मोर्चा
जुन्नरमध्ये महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. जुन्नर येथील भिमनगर पाडळी येथून निषेध मोर्चा काढण्यात आला होता. नवीन एस.टी. बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षांसह अलका फुलपगार, आरपीआयचे तालुका अध्यक्ष गौतम लोखंडे, संभाजी साळवे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव यामध्ये सहभागी झाले होते. आंदोलकांच्या वतीने तहसीलदार किरण काकडे यांना निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनखाली केलेल्या बंदोबस्तामुळे कुठलाही अनुचित प्रकार येथे घडला नाही.

शिरुरमध्ये शुकशुकाट
शिरूर शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. अत्यावशक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. हा बंद शांततेत पार पडला. कुठलाही अनुचित प्रकार यावेळी घडला नाही. संपूर्ण शहरातील व्यवहार सकाळपासून बंद होते. बाजार पेठाही बंद होत्या. भाजी बाजारावरसुद्धा या बंदचा परिणाम झाला. शहरात शुकशुकाट पसरला होता. महाविद्यालय व शाळा मात्र चालू होत्या. एसटी बस स्थानकावरसुद्धा एसटी तुरळक होत्या. लांबपल्ल्याच्या एसटी फिरकल्याच नाही. त्यामुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांचे हाल झाले. या बंदच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी चौकाचौकात चोख बंदोबस्त ठेवला होता.

दंगलग्रस्त भागाची पाहणी
कोरेगाव भिमा, डिंग्रजवाडी फाटा, सणसवाडी, शिक्रापुर परिसरातील दुकाने, हॉटेल, टपर्‍या पेटवून देण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. या पार्श्‍वभूमीवर आमदार अ‍ॅड. अशोकबाप्पु पवार यांनी या दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. दुर्घटनाग्रस्त नागरीकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली व संबंधीत अधिकार्‍यांशी चर्चा करून पंचनामे करण्यासाठी सूचना दिल्या. परिसरातील सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेऊ नका. गर्दी न करता आपआपली कामे सुरू करा तसेच या सर्व गावातील ग्रामस्थांना शांतता राखण्यासाठी आवाहन त्यांनी केले.

दौंडमध्ये तणावपूर्ण शांतता
दौंड शहरासह तालुक्यातील विविध भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवीत बंदमध्ये सहभाग घेतला. दौंड शहरासह ग्रामीण भागातील बहुतांश शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी तणावपूर्ण शांतता होती. त्यामुळे सर्व व्यवहार ठप्प पडले होते. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. भीम सैनिकांनी तालुक्यातील दौंड, वरवंड, यवत, खुटबाव, पाटस आदी विविध ठिकाणी निषेध सभा घेत व निषेध फेरी काढीत सरकारचा निषेध केला. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यवत येथे झालेल्या निषेध सभेत उत्तम गायकवाड, दत्ता डाडर, गणेश कदम, हेमलता बढेकर, उत्तम सोनवणे, विजय शेंडगे, अनिल गायकवाड, डॉ. संतोष बढेकर आदी उपस्थित होते.

कुकुंभमध्ये तणाव
कुरकुंभ येथे सकाळी 11 वाजता गावामध्ये मोर्चा काढून कुरकुंभ चौकामध्ये निषेध सभा घेण्यात आली. तसेच व्यापार्‍यांना बंदचे आवाहन करण्यात आले. बंदला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दलितांवर होणारे अत्याचार लवकरात लवकर रोखले पाहिजेत, असे राहुल भोसले यांनी सांगितले. नवनाथ गायकवाड यांनी पोलिसांचा निषेध व्यक्त केला. सदर गावामध्ये कुरकुंभ, रावणगाव, मळद कौठडी, जिरेगाव व इतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस बंदोबसमध्ये वाढ करण्यात आली. सदर घटनेची चौकशी करून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी, असे निवेदन कुरकुंभ भिम अनुयायींनी दौंड पोलिस प्रशासनाला लेखी स्वरूपाचे निवेदन दिले.