बंद उपसा सिंचन योजनांचा 15 दिवसात निर्णय

0

शहादा । शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या बंद पडलेल्या जिल्हाभरातील उपसा योजनांसाठी 15 दिवसात मंत्री मंडळाची तात्काळ बैठक घेवून 15 दिवसाच्या आता निर्णय घेवून योजना सुरू करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. अश्‍व म्युझियमचे उद्घाटन त्यांच्याहस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. सारंगखेड्यात एक जागतिक दर्जाचे पशुचिकित्सालयही उभारणार असल्याचा मानस व्यक्त करीत, यासाठी लवकरच केंद्रासोबत बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्याचा विकासासाठी पर्यटनाच्या विकासासाठी सदैव जयकुमार रावल यांच्या पाठिशी राज्यसरकार व मी स्वतः उभार राहणार, असल्याचीही त्यांनी यावेळी ग्वाही दिली.

रोजगार निर्मितीला वाव
नंदुरबार जिल्ह्याला पर्यटनसाठी भरपूर वाव असून या पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. इंडस्ट्रीपेक्षा मोठी रोजगाराची संधी ही पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होणारी आहे. यात पानटपरीपासून ते मोठा व्यवसायधारकाला याचा लाभ मिळेल व या माध्यमातून आर्थिक परिस्थिती सुधारेल. जयकुमार रावल यांचा रण उत्सव राजस्थान येथील महोत्सवाबरोबर चेतक फेस्टीवल सारंगखेडा हा देखील जागतिक करण्याचा संकल्प येत्या 2-3 वर्षात पूर्ण होईल. यावर्षी 2 देशांचे पर्यटक आले. पुढच्या वर्षी 50 देशांचे पर्यटक येतील, असा विश्‍वास व्यक्त करीत त्याचबरोबर तोरणमाळ, प्रकाशा, सारंगखेडा हे स्थळे जागतिक पातळीवर येणार असून बॅरेजच्या माध्यमातूनही पर्यटनासाठी बोटींग व इतर साधने निर्माण करू. तोरणमाळसाठी 5 कोटीचा निधी दिला असून लवकर येथे पर्यटकांसाठी एक भव्य संकुल उभारणार. तोरणमाळचे बँडींग झाले नाही हे दुर्दैव असल्याने त्याचा विकास करणार. पर्यटनाचे सर्कीट तयार करणार. तसेच आदीवासी संस्कृती जगासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रेखा चौधरी यांनी वेलनेसच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून ग्रामीण भागातील मुलामुलींना रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे कौतुक केले.

जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगार – मंत्री रावल
पर्यटनमंत्री श्री. रावल म्हणाले, सारंगखेडा येथील यात्रोत्सव म्हणजे बहुआयामी यात्रोत्सव आहे. यात्रेच्या माध्यमातून येथील परंपरा, संस्कृती सर्वोच्च पदाला नेण्याचे प्रयत्न असून जगासमोर येण्यास मदत होईल. सारंगखेडा बॅरेज येथे वॉटर स्पोर्ट विकसित करण्यात येईल. याशिवाय प्रकाशे, रावलापाणी, तोरणमाळ, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा विकसित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक पर्यटन स्थळे, अभयारण्य याविषयी जनजागृतीची मोहीम राबविण्यात येईल. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात सर्वाधिक पर्यटक येतील, असा विश्वास पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी व्यक्त केला.मी पर्यटन मंत्री असतांना काही कामे अपूर्ण राहीली ते मी करू शकलो नाही मात्र ते अपूर्ण कार्य जयकुमार रावल करीत आहेत, याचा आनंद असून जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून पर्यटन वाढीसाठी नंदुरबार जिल्ह्यात भरपूर वाव असल्याचे आमदार विजयकुमार गावित यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती
पर्यटनमंत्री जयकुमार रावल, खा.हिना गावीत, आ.विजयकुमार गावीत तसेच उपस्थित प्रमुख मान्यवरांचा महाराष्ट्र पर्यटन विकास विभागाकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाअगोदर धवलसिंह मोहिते पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सत्कार त्यांचे वतीने रणवीर रावल यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत वाघुर्डे, उपविभागीय पोलिस अधिकारी महारू पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार मनोज खैरनार, विक्रांतसिंह रावल,दिग्विजयसिंह रावल, देवेद्रसिंह रावल, प्रणवराज रावल, जि.प.सदस्य ऐश्‍वर्या रावल, सरपंच भारती कोळी, रणवीरसिंह रावल, चंद्रपालसिंह रावल,पर्यटन विभाग व्यवस्थापक विजय वाघमारे, सहा.व्यवस्थापक आशुतोष राठोड, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, महाव्यवस्थापक स्वाती काळे, उप महाव्यवस्थापक चंद्रकांत जयस्वाल आदी उपस्थित होते.

जयकुमार रावल, जयपाल रावल या दोघांचे श्रेय
सारंगखेडा येथील एकमुखी दत्ताच्या यात्रोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येथील जगातील अर्थात आशिया खंडातील 3 रे व भारतात प्रथम क्रमांकाचे अश्‍व म्युझीयमच्या उद्घाटनाचा सोहळा पार पडला. आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, माझ्याकडे पर्यटनखाते होते, मात्र माझ्याकडून जे जमले नाही त्यापेक्षा दहापट अधिक काम जयकुमार रावल यांनी या विभागात करून दाखवले याचा मला सार्थ अभिमान आहे. खरं तर जयकुमार रावलं व चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपाल रावल यांच्या संकल्पनेतूनच हा महोत्सव खर्‍या अर्थाने जगात नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला असून याचे श्रेय या दोघांना जाते, असे गौरोद्गारही मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

लाखो पर्यटक येतील
सारंगखेडा येथील अश्‍व बाजाराला गेल्या 350 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. येथे भारतात अश्‍वप्रेमी व विक्रेते मोठ्या प्रमाणावर येतात. येथे घोड्यांच्या विविध प्रजाती आपल्याला पहावयास मिळतात. घोड्याचे आकर्षण हे प्रत्येकाला असते. पूर्वी महाराणा प्रताप यांचा चेतक असो वा शिवाजी महाराजांची कृष्णा ही घोडी असो ह्या अश्‍वाचा इतिहास हा मोठा आहे. येथील सोयी सुविधा पाहून मी अवाक झालो. विशेष करून रशिया येथील अश्‍व फोटोग्राफर कानिया हीची फोटोंची प्रदर्शनी ही अप्रतीम आहे. येथे जगातील 3 रे व भारतातील पहिले अश्‍वसंग्राहलयाचे भूमीपूजन करतांना मला सार्थ अभिमान वाटतो. सारंगखेडा हे गाव पर्यटनाच्या नकाशावरचे एक आकर्षण बनणार असून येथील अश्‍व म्युझियमला देखील लाखो पर्यटक हजेरी देतील यात शंका नाही.

चित्रप्रदर्शनाची पाहणी
चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे अश्वांवर आधारीत चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाची मुख्यमंत्री श्री. फडणवीस, पर्यटन मंत्री श्री. रावल, खासदार डॉ. गावित, आमदार डॉ. गावित, जयपालसिंग रावल आदींनी पाहणी केली. या प्रदर्शनात जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणार्‍या ई- डिजिटल साप्ताहिक यशार्थने सारंगखेडा येथील यात्रोत्सवावर लिहिलेल्या अंकाचे स्वतंत्र दालन लावण्यात आले आहे. या दालनाची जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी मान्यवरांना माहिती दिली. थरारक कसरती करतात. या कसरतींची अत्याधुनिक आणि वातानुकूलीत अशा प्रेक्षक गॅलरीतून मुख्यमंत्री श्री. फडणवीस, पर्यटन मंत्री श्री. रावल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी पाहणी केली. मुख्यमंत्री महोदयांनी या व्यावसायिकांच्या कसरतीबद्दल कौतुकोद्गार काढले.