भुसावळातील सर्वच एटीएममध्ये खडखडाट ; नोटबंदीच्या फसव्या निर्णयानंतर जनतेची आर्थिक कोंडी
भुसावळ:– व्यवहारातील काळा पैसा बाहेर आणण्यासाठी 8 नोव्हेंबर 2016 रोजी सरकारने नोटबंदी करीत पाचशे व एक हजारांच्या नोटा चलनातून बाद करून दिड वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरीदेखील अर्थव्यवस्था अद्यापही वळणावर आली नसल्याचे चित्र असतानाच शहरासह जिल्ह्यातील सर्वच एटीएममध्ये नेहमीच राहत असलेल्या खडखडाटामुळे संतप्त शिवसैनिकांनी रविवार, 22 रोजी शहरातील एटीएम मशीनला हार घालत अनोखे गांधीगिरी आंदोलन केले. या आंदोलनानंतर शहरातील ढीम्म बँक अधिकार्यांना जाग येऊन एटीएम नियमित सुरू राहतील, अशी शहरवासीयांना माफक अपेक्षा आहे. शहरातील एटीएम नेहमीच बंद राहत असल्याने सर्वसामान्यांची गळचेपी होत असून त्यांना व्यवहार करणे कठीण ठरत आहे. शहरातील जवळपास सर्वच एटीएम बंद आहेत.
सेनेच्या आंदोलनाने बँक अधिकार्यांना जाग येण्याची अपेक्षा
शनिवारी बँकेला सुटी नसल्याने रविवारी सकाळी 11 पर्यंत एटीएम ठप्प राहिल्याने शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळमध्ये प्रा.धिरज पाटील यांच्या नेतृत्वात बँक एटीएमच्या मशीनला पुष्पहार घालत अनोखे गांधीगिरी आंदोलन केले. याप्रसंगी शिक्षकसेना जिल्हा प्रमुख प्राचार्य विनोद गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख हिरामण पाटील, मनोहर (पप्पू) बारसे, उपशहर प्रमुख राकेश खरारे, निलेश महाजन, संतोष सोनवणे, सोनी ठाकुर, योगेश बागुल, अमोल पाटील, शरद जोहरे, दत्तु नेमाडे, सुनील बोंडे, बबलू बर्हाटे, वरणगावमध्ये निलेश ठाकुर, अबरार खान, गोकुळ बाविस्कर, सुरेंद्र सोनवणे, तुषार बर्हाटे, विक्की चव्हाण आदींनी शहरातील प्रत्येक बंद असलेल्या एटीएमला पुप्षहार घालून गांधीगिरी आंदोलन केले. या आंदोलनाचा फोटो फ्रेम करून नोटबंदीची आठवण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेट दिला जाईल, असे मनोहर बारसे यांनी सांगितले. दरम्यान, या आंदोलनानंतर तरी बँक अधिकार्यांना जाग येईल व एटीएम सुरू राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.