मुक्ताईनगर । शहरातील आदर्श न्यू इंग्लिश स्कुलजवळील खदानलगत प्लॉट क्रमांक 1483, 300 चौ.फु. मिळकतीचा सार्वजनिक रस्ता बंद करण्यात आल्यामुळे या रस्त्याच्या मागणीसाठी रोहिदास शिरसाठ यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. रोहिदास शिरसाठ यांच्या मालकीचे प्लॉट क्रमांक 1483 हा असून जुन्या मुक्ताबाई रोडलगत खदानीजवळ या प्लॉटकडे जाणार्या सार्वजनिक रस्त्यावर काही राजकीय पुढार्यांनी संरक्षण भिंत बांधून रहदारीचा रस्ता बंद केला आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष
ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार करुनसुध्दा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने शिरसाठ यांनी गटविकास अधिकार्यांनादेखील यासंदर्भात निवेदन दिले. तरीही न्याय मिळत नसल्याने त्यांनी उपोषण सुरु केले आहे.
आवास योजनेेंतर्गत घराला मंजुरी
शिरसाठ हे या जागेचे भोगवटधार असून पंतप्रधान आवास योजनेेंतर्गत घर मंजूर झाले आहे. या प्लॉटकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने घरबांधणीसाठी लागणारे साहित्य कसे व कोठून घेवून जायचे या अडचणी निर्माण होत असल्याने शिरसाठ यांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला.
भिंत हटवावी
शहरातील काही राजकीय पुढार्यांचा मनमानी कारभार सुरु असून त्यांनी रस्त्यावरच हि भिंत बांधल्यामुळे भविष्यात या भागात रहिवासाला येणार्या नागरिकांना देखील याचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे ही भिंत हटवून सार्वजनिक रस्ता पुर्ववत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.