धुळे । शहरातील हजारखोली भागात असलेल्या मुल्ला कॉलनीत घरफोडी झाली. मध्यरात्री हा प्रकार लक्षात येताच पोलिसात तक्रार करण्यात आली. घरातील दीड लाखांच्या रोकडसह दागिने मिळून सव्वा दोन लाखांचा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावरोड परिसरातील हजारखोली लगत असलेल्या मुल्ला कॉलनीतील प्लॉट नं.54 येथे जावीद जमलोद्दीन शेख हे परिवारसह राहतात. जुन्या गाड्या खरेदी-विक्रीचा त्यांचा व्यवसाय असून त्यांच्या परिवारातील सदस्य रविवारपासून बाहेरगावी गेले होते.
परिवारातील सदस्य रविवारपासून बाहेरगावी
जावीद शेख सकाळी 11 ते रात्री 11 या वेळेत व्यवसायानिमित्त बाहेर असल्याने त्यांचे घर बंद होते. हीच संधी चोरट्यांनी साधली. त्यांच्या बंद घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील बेडरूममध्ये असलेल्या लोखंडी कपाटातील दीड लाखाच्या रोकडसह 9 ग्रॅम सोन्याचे पदक, 5 ग्रॅम सोन्याची फुली, 10 ग्रॅम वजनाचे काप, इयररिंग, 10 ग्रॅम वजनाचे कर्णफूले असा एकूण 2 लाख 18 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. काल रात्री 11.30 च्या सुमारास जावीद शेख हे घरी परतले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ चाळीसगावरोड पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. पुढील तपास उपनिरिक्षक पांढारकर करीत आहेत.